चंद्रपूर:अंगाची लाहीलाही करणाऱ्या तापमानात हजारो आदिवासींनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसापासून पोंभुर्णा शहरातील मध्यभागी असलेल्या बसस्थानक चौकात ठिय्या दिला आहे. ५० टक्के आदिवासीबहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, ५० वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सूरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढवण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन आदिवासींचे हे आंदोलन सुरू आहे.

दुसऱ्या दिवशी प्रशासनासोबत वाटाघाटी झाल्या मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलनकांनी आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिका घेतल्याने परिस्थिती चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारची रात्र आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळीच झोपून आंदोलन अधिक तीव्र केले आहे. आज बुधवारला पहाटेपासून आंदोलनाला परत सुरुवात झाली आहे. यावेळी आंदोलनकर्ती शालू केमदास तलांडे या महिलेची प्रकृती बिघडली होती. मात्र, त्यांनी दवाखान्यात जाण्यास नकार देत शेवटच्या श्वासापर्यंत आंदोलन करण्याची रोखठोक भूमिका घेतली.

हेही वाचा >>>वर्धा: दारूची लत सुटण्यासाठी घेतली जडीबुटी, थोड्याच वेळात…

या आंदोलनात जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील आदिवासी बांधव पुन्हा जमण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळपासूनच पोंभुर्णा शहरातील आंबेडकर चौकातही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. या मार्गाने होणारी सर्व वाहतूक त्यांनी बंद केली होती. मात्र काही वेळानंतर ती सुरू केली. मात्र बस स्टॉप चौकातील मुख्य मार्ग बंद असल्याने सामान्य नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांनी ये जा करण्यासाठी रस्त्याची एक बाजू सुरू करण्याची विनंती गावकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना केली आहे. आंदोलकांनी उन्हापासून महिला व चिमुकल्यांना वाचवण्यासाठी बस स्टॉप चौकात मंडप टाकून सावली केली आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता एक औपचारिक बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत आंदोलनकर्त्यांसोबत अपर जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांची उपस्थिती होती. या बैठकीत सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या मागणीसंदर्भाने कोणताही तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन यापुढेही असेच सुरू राहील असे आदिवासी व बहुजन समाज आंदोलनाचे नेते जगन येलके यांनी माध्यमांना सांगितले.आंदोलनात आपापल्या आईवडिलांसोबत लहान मुलांचीही संख्या मोठी आहे. दुपारी आंदोलन स्थळाला भेट देत भूमिपुत्र ब्रिगेडच्या नेत्या डाॅ. अभिलाषा गावतुरे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच बंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भुषण फुसे यांनी सुद्धा पाठिंबा असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड प्रकल्पातील गैरव्यवहाराची ‘एसआयटी’ मार्फत चौकशीची मागणी

दोन महिलांची प्रकृती खालावली

बुधवारी दुपारनंतर अंदाजे साडेचार वाजताच्या दरम्यान बोर्डा दीक्षित येथील करिष्मा कालिदास कुसराम (३२) या महिलेची प्रकृती खालावली. तिला जवळच असलेल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या घटनेच्या अवघ्या दहा मिनिटानंतरच चेकठाणेवासना येथील अर्चना विनोद कुळमेथे या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला सुद्धा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.