कधीतरी जंगलातून तो गावात भटकायचा.. हळूहळू त्याला जणू त्या गावाची ओढच लागली.. त्याचे येणे त्या गावकऱ्यांनाही सवयीचे होऊन गेले. हळूहळू तो त्या गावातलाच एक सदस्य झाला. त्याच्या येण्याची प्रत्येक गावकरी वाट पाहायचा, पण एक दिवस अचानक तो गेला. उच्चदाब वीजवाहिन्याने त्याचा जीव घेतला आणि सारे गाव हळहळले. त्यादिवशी कुणाच्याच पोटात अन्न गेले नाही. अकोला जिल्ह्यातील अंत्री मलकापूर गावात येणारा मोर आणि त्याला जीव लावणारे गावकरी ही केवळ आता कथा बनून राहिली आहे.
साधारण पाचएक वर्षांपूर्वी एक मोर या गावात आला. जंगलातला हा रहिवासी गावात कसा आला याचे गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटले. वाट भटकला असेल म्हणून त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, त्याची ही वारी फक्त त्या दिवसापूरतीची नव्हती तर तो रोजच तिथे यायला लागला. हळूहळू गावकऱ्यांना त्याच्या येण्याची सवय लागली. त्याच्या आवाजाने गावकरी उठायचे. मोराच पिसारा फुलताना बघणे हे प्रत्येकाच्या वाट्याला येते असे नाही, पण गावकऱ्यांना तो रोज पिसारा फुलवून दाखवत होता. गावातल्या कुणी ना त्याच्या पिसाऱ्याला कधी छेडले, ना कधी त्याची मोरपिसे तोडली. मात्र, त्याचे ते सुंदर रुप गावकरी रोज त्यांच्या आठवणीत साठवून ठेवायचे. तीन दिवसांपूर्वी तो नेहमीप्रमाणे गावात आला. इकडेतिकडे बागडला आणि एका वीजवाहिनीच्या तारावर जाऊन बसला. ती वीजवाहिनी त्याचा कर्दनकाळ ठरेल याची त्याला कल्पनाही नव्हती. दुर्दैवाने अतिउच्चदाब वीज वाहिनीचा त्याला जोरदार झटका बसला आणि खाली कोसळला. गावकऱ्यांच्या डोळ्यासमोरच हे घडले. क्षणभर कुणाला काहीच सुचले नाही.
गावात स्वच्छंदपणे बागडणाऱ्या मोराचा निष्प्राण देह पाहून साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या निधनाने त्या दिवशी गावात चूल पेटली नाही. तो मूळचा जंगलाचा निवासी असल्याने गावकऱ्यांनी वनखात्याला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्रसिंह ओवे, वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक मोरे, गजानन म्हातारमारे, नाथ महाराज, यशपाल इंगोले, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी गावकऱ्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या मोराला निरोप दिला.