बुलढाणा : नामांतर झाल्यानंतर ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर कायम चर्चेत आहे. नुकतीच झालेली दंगल, महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा याने उडालेला धुरळा खाली बसत असतानाच आता संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त ‘ओबीसीं’चा आवाज बुलंद होणार आहे.

बहुचर्चित ‘मंडल आयोग’चे अध्यक्ष बी पी मंडल यांचे नातू प्रा. डॉ. सुरज मंडल यांचा मार्गदर्शन सोहळा मुख्य आकर्षण ठरणार आहे. निमित्त आहे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या ९ एप्रिल रोजी औरंबादेत आयोजित शिबिराचे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके (बुलढाणा) यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडणार आहे.

येत्या रविवारी ( ता.९) तेथील सूतगिरणी चौकातील रेड वेलव्हेटमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्वेच्छानिवृत्तीपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी ही संघटना स्थापन केली. त्याचे जाळे आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. विविध आरक्षणचा गुंता, न्यायालयीन लढे यामुळे संभ्रमित इतर मागासवर्गीय समूह या बाबी लक्षात घेता संघटनेचे कार्य व मार्गदर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – अकोला : याला म्हणतात शिस्त! हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी महापंगत; वानरसेनेचा रांगेत बसून प्रसादावर यथेच्छ ताव..

यासंदर्भात सुनील शेळके म्हणाले की, या शिबिराचे उदघाटन प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते होणार आहे. बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे ते नातू असून ‘भविष्यातील ओबीसींचे आंदोलन कसे असायला हवे?’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. प्रमुख वक्ते तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड हे ‘सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोरील आव्हाने’ हा विषय उलगडून सांगणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके हे राहणार आहे.

दुसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे हे ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व त्यातील अडचणी या उपयुक्त विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

हेही वाचा – वर्धा : अशी ही बनवाबनवी; सरपंच कुणाचे, दावा कुणाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे शिबीर ओबीसी समुहासाठी बौद्धिक प्रबोधन ठरणार आहे. तसेच समुहाची सध्याची संक्रमण स्थिती व भविष्यातील संभाव्य आव्हाने याविरुद्ध लढण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. शिबिरात विदर्भासह राज्यभरातील पदाधिकारी, सभासद सहभागी होणार असल्याने संभाजीनगरात ओबीसींचा आवाज बुलंद होणार, असा आत्मविश्वास शेळके यांनी बोलून दाखविला.