खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून याबाबत कुठलाही वाद नाही. खात्यात बदल करायचा असेल तर चर्चा करून ठरवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, खाते वाटप झाल्यावर संबंधित मंत्री त्यांच्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. सध्या निम्मेच मंत्रिमंडळ असल्याने सर्वांवर अतिरिक्त खात्याचा भार आहे. मंत्र्याकडील अतिरिक्त खाती पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी त्या-त्या गटातील नवीन मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदलाबदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ठरवू. विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि योग्य वेळ पाहून ते ठरवतील, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा करार झालाच नव्हता या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शिंदे यांच्या विधानात तथ्य आहे. मी पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मीच केल्या आहेत. आमच्यावर बेईमानीचा आरोप केला जातो. मात्र सर्वात मोठी बेईमानी आमच्यासोबत झाली, अशी टीका त्यांनी केली.