नागपूर : शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मलवाहिनीची समस्या बघता तत्काळ नव्याने ‘ड्रेनेज सिस्टीम’चा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. परंतु, महापालिकेने त्यासंदर्भात अद्यापही कुठलीही कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली आहे. 

मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचण्याचे प्रकार समोर आल्यानंतर गडकरींनी महिन्याभरापूर्वी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात महापालिकेने शहरातील विविध भागात सर्वेक्षण करून नवीन ‘ड्रेनेज सिस्टीम’चा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता महिना लोटला तरी याबाबत  कुठलीही कार्यवाही झालेली नाही. शहरातील काही भागात नवीन मलवाहिनीचे काम सुरू आहे. मात्र, ते अर्धवट आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकरणामुळे जुन्या ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्या आहेत. आता शहराची लोकसंख्या २४ लाखांवर गेली आहे.

शहराचा विस्तार वाढत असून त्याचा ताण जुन्या ‘ड्रेनेज लाईन’वर येत आहे. नव्याने व्यवस्था निर्माण करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांच्या सांडपाणीबाबतच्या समस्या वाढल्या आहेत.

नव्याने ‘ड्रेनेज लाईन’ टाकण्याबाबत महापालिकेकडून काम सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून संथगतीने काम सुरू आहे. पावसाळय़ात शहरातील अनेक भागात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे घाण पाणी लोकांच्या घरासमोर व रस्त्यावर येत आहे. त्याचा त्रास आणि मन:स्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळय़ात नाल्यांतील किंवा गटारात गाळ साचल्यानंतर अनेक महिने काढला जात नाही. एखाद्याची तक्रार आली की तेवढय़ापुरते जेट मशीन लावून ‘ड्रेनेज लाईन’चा मार्ग मोकळा केला जातो. मात्र, गाळ काढला जात नाही.

पुन्हा ‘ड्रेनेज’ तुंबली की तात्पुरती उपाययोजना केली जाते, असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू आहे. मात्र, यावर स्थायी अशी व्यवस्था करण्यात महापालिकेला अजूनही यश आले नाही. काळाच्या ओघात गृहप्रकल्प, अपार्टमेंटची संख्या वाढत आहे. तेथील ‘ड्रेनेज’चा ताण जुन्या ‘ड्रेनेज लाईन’वर पडत आहे.

सांडपाण्याची समस्या तीव्र होणार

पूर्व, उत्तर, दक्षिण पश्चिम आणि मध्य नागपुरातील अनेक भागात ‘ड्रेनेज लाईन’ समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. महापालिकेकडून आतापर्यंत २२ किलोमीटर अंतराची ‘ड्रेनेज लाईन’ टाकण्यात आली आहे. त्यामुळेच गडकरी यांनी सांडपाणी वाहून नेणारी ‘ड्रेनेज सिस्टीम’ नव्याने तयार करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. मात्र, अजूनही प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्यामुळे येणाऱ्या दिवसांत सांडपाणी वाहून नेणारी ‘ड्रेनेज सिस्टीम’ खराब होण्याची शक्यता बघता शहरात सांडपाण्याचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.