बुलढाणा: लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त नेत्यांचे सर्वसामान्याच्या समस्या, अडचणीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. बुलढाणा मतदारसंघातील कमीअधिक दोन लाख मतदारांचे घडाभर पाण्यासाठी बेहाल होत असताना नेते मात्र प्रचार, राजकारणात व्यस्त आहे. यावर कळस म्हणजे टंचाईच्या भीषण झळा सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघानाच पोहोचत आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मेहकर तालुका खासदार प्रतापराव जाधव यांच्या गृहक्षेत्रात आहे. तीन वेळा जाधवांना आमदार व राज्यमंत्री बनविणाऱ्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा मेहकर तालुका केंद्रबिंदू आहे. या तालुक्यातील वरवंड, जवळा, बोथा, वडाळी या गावांतील हजारो ग्रामस्थांना रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे. याशिवाय तीस गावांना अधिग्रहित खासगी विहिरींवरून होणाऱ्या पुरवठ्यावर तहान भागविण्याची दुर्देवी वेळ आली आहे. वडाळी, रत्नापूर, उकळी, खंडाळा, निंबा, बारडा, लोणी काळे, हिवरा साबळे, शेंदला, लवणा, सुकळी, मेळ जानोरी, गणपूर, जयताळा, मोळा, पारडी, मारोती पेठ, वरवंड, वरमला पारधी वस्ती, सुळा, पारखेड, पांगरखेड, उटी, विश्वि, खामखेड, पाचला, खुदनापूर, जावळा, बोथा, शहापूर, मोहना खुर्द या टंचाईग्रस्त गावांचा समावेश आहे. लोणार तालुक्यातील ४ गावांना अधिग्रहित विहिरावर अवलंबून राहावे लागत आहे.

हेही वाचा – अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेसमधून मी बाहेर पडल्याने फरक…”

सिंदखेडराजा व चिखलीतही बेहाल

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे यांच्या सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगाव राजा तालुक्यात पाणी पेटले आहे. तालुक्यातील सरंबा, वाकी खुर्द, उंबरखेड, डिग्रस बुद्रुक, सुरा, कुंभारी, पिंपळगाव चिलमखा या गावांची तहान टँकरने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याद्वारे भागविली जात आहे. याच तालुक्यातील २४ गावांना ४५ अधिग्रहित खासगी विहिरीद्वारे पाण्याची गरज भागविण्याची वेळ आली आहे. सिंदखेडराजामध्ये ३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या चिखली मतदारसंघातही पाणी पेटले आहे. हातनी, कोलारा, सातगाव भुसारी, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड सपकाळ, सैलानी नगर, गोंधनखेड, बेराळा या गावांना पाण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाहीये! याशिवाय २६ गावांसाठी ३२ खासगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा – “महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

बुलढाण्यातही तीव्रता

आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा मतदारसंघातील सुमारे पाऊणलाख मतदारांनाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपळखेड, ढासाळवाडी, डोंगरखंडाळा, सावळा, सुंदरखेड, हनवतखेड, चौथा, माळविहीर, या गावांची तहान टँकरने भागविली जात आहे. याशिवाय ४ गावांना खासगी विहिरींचा सहारा आहे. मोताळा तालुक्यातील राजूर, चिंचखेडनाथ, इसलवाडीमध्ये टँकर तर १३ गावांची तहान विहिरीद्वारे भागविली जात आहे.