नागपूर : तरुणीवर अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सहसत्र न्यायाधीश एस.ए श्रीखंडे यांनी वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वासुदेव देवराम मरघडे (३३ रा. खरबी), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये दुपारी ३ वाजताच्या सुमारास नंदनवन हद्दीत राहणाऱ्या सतरा वर्षीय तरुणीच्या घराचे बांधकाम करण्यासाठी आरोपी गेला. तरुणीच्या घरी कुणी नसताना आरोपीने त्याचा फायदा घेऊन तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणाला काहीही सांगितल्यास तुला व तुझ्या आईला मारून टाकेल, अशी धमकी देत तिला गर्भवती केले. तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >>> नागपूर : उत्सुकता शिगेला, मतमोजणी सुरू, गाणार, अडबाले की झाडे?
आरोपीला ९ ऑक्टोबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. तपास अधिकारी किशोरी माने यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्या. श्रीखंडे यांनी साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस भादंविच्या कलम ६ पोक्सोमध्ये २० वर्षे शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे ॲड. विजया बालपांडे यांनी बाजू मांडली.