नागपूर : Maharashtra mlc election result 2023 नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजतापासून सुरुवात झाली असून शिक्षकांचा कौल विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्या बाजूने जाणार की माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले वा शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यापैकी एका नवीन चेहऱ्याला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.

दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार असले तरी मतदानकेंद्राच्या बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजनी येथील सामुदायिक भवनात मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळी सकाळी ७.३० वा. स्ट्राँगरुम उघडण्यात आली. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वा. सुरुवात झाली. मतमोजणीसाठी २८ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल.

हेही वाचा >>> Maharashtra MLC Election Results Live: “..म्हणून मी जिंकणार”,शुभांगी पाटील यांनी सांगितलं मतांचं गणित; सत्यजीत तांबेंच्या पराभवाचा दावा!

शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी ८६.२३ टक्के मतदान झाले होते. रिंगणात एकूण २२ उमेदवार असले तरी खरी लढत शिक्षक परिषदेचे नागो गाणार (भाजप समर्थित) , माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले (मविआ समर्थित) व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे या तीन उमेदवारांमध्ये आहे. तिघांपैकी कोण निवडून येणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.