वर्धा : सेलू तालुक्यातील आमगाव शिवारात आज सायंकाळी उशीरा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले, तर एक जखमी असून त्यास रुग्णालयात हलविण्यात आले. सिंदी रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहे.
पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अपघाताबाबत सांगितले की, तीन ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. उशीरा प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील पंजाब कॉलोनी येथील जुनघरे परिवार हा वर्ध्यातून नागपूरसाठी निघाला होता. खडकीपुढे आमगाव येथे गाडी येताच विरुद्ध दिशेने नागपूरहून ट्रक येत होता. त्यातच स्पीड ब्रेकर आडवे आले. वेग नियंत्रित न झाल्याने कार थेट रस्त्याच्या बाजूच्या सांडपाण्यात उलटली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला.
वैशाली जयंत जुनघरे (४७), आस्था जयंत जुनघरे (१९) आणि सोनू जयंत जुनघरे (२४), अशी मृतांची नावे आहेत. जयंत वासुदेव जुनघरे हे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त गाडी आय टेन असल्याचे सांगितले जाते. वृत्तलिहिस्तोवर जखमी जयंत जुनघरे यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस धावपळ करीत होते. सर्व यंत्रणा अपघात पंचनामा व वाहतूक नियंत्रणात गुंतल्या असल्याने सविस्तर माहिती देणे शक्य नसल्याचे संबंधित पोलिसांन स्पष्ट केले.