वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

सिंदेवाही वनक्षेत्रातील गुंजेवाही येथे कार्यरत अग्निशमन निरीक्षक अशोक चौधरी यांचा सहा महिन्यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला नुकतेच स्वयंसेवी संस्थेतर्फे तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

अग्निशमन निरीक्षक म्हणून अशोक चौधरी गेल्या १२ वर्षांपासून वनखात्यात कार्यरत होते. १४ जूनला कर्तव्यावर असताना त्यांच्या बिटमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. त्यामुळे ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग यांनी सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांना चौधरी यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया संस्थेने पुढाकार घेतला. आयसीआयसीआय या बँकेसोबत मिळून ही संस्था एका योजनेअंतर्गत जंगल आणि वन्यजीवांसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना मदत करते.  अलीकडेच या संस्थेने जंगल आणि वन्यजीव संवर्धन कार्यात ५०वष्रे पूर्ण केली. या संस्थेने अशोक चौधरी यांच्या कुटुंबीयांना दोन डिसेंबरला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. जंगलाचे रक्षण करताना अशोक चौधरी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासारख्या जंगल रक्षणासाठी काम करणाऱ्या कुटुंबाला मदत करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक कुलराज सिंग म्हणाले. वनमजूर हे वनविभागाचा पाठीचा कणा आहे. त्यामुळे जंगलाच्या रक्षणासाठी त्यांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची आहे.वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित वनाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील, असे डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अजिंक्य भटकर म्हणाले. यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार, सरपंच सिंधू बारसागडे, उपसरपंच परशुराम तोरे आदी उपस्थित होते.