अमरावती : दहावीचा निकाल लागून साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.अमरावती विभागात अकरावीच्या तब्बल ६३ हजार ४६९ जागा रिक्त असल्याचे चित्र आहे.शिक्षण विभागाने केंद्रीभूत पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली. अखेरच्या फेरीनंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने आणखी एक विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे.
३ ते ६ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज व पसंतीक्रम नोंदवता येणार असून ८ सप्टेंबरला निवड यादी प्रसिद्ध होईल. प्रवेश निश्चित करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर ही आहे. महाविद्यालयातून अकरावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र अमरावती विभागात अकरावी प्रवेश क्षमतेपेकी एकूण ६३ हजार ४६९ जागा रिक्त राहिल्या असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या रिक्त जागांमुळे शिक्षक संच मान्यतेनंतर त्याचा परिणाम होणार असल्याची भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ४२२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी एकूण प्रवेश क्षमता ही १ लाख ९१ हजार ७५ इतकी आहे. त्यापैकी अकोला जिल्ह्यात ३७ हजार ४७६, अमरावती जिल्ह्यात ४२ हजार १८०, बुलढाणा जिल्ह्यात ४७ हजार २९०, वाशीम जिल्ह्यात २४ हजार आणि यवतमाळ जिल्ह्यात ४० हजार १३० जागा आहेत.
आतापर्यंत अकोला जिल्ह्यात कला शाखेत ७७०२, वाणिज्य शाखेत १९८२ आणि विज्ञान शाखेत १२७७३, अशा एकूण २२ हजार ४५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात कला ११६९१, वाणिज्य २९७१, विज्ञान १४३११, एकूण २८९७३, बुलढाणा जिल्ह्यात कला ११२०७, वाणिज्य २७२२, विज्ञान १८८७७, एकूण ३२८०६, वाशीम जिल्ह्यात कला ५४८०, वाणिज्य ७५७, विज्ञान १०१२३, एकूण १६३६०, यवतमाळ जिल्ह्यात कला १२८१७, वाणिज्य १९८२, विज्ञान शाखेत १२२११ असे एकूण २७०१० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
अनेक विद्यार्थी तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत. अद्याप विभागात अकरावी प्रवेशाच्या ६३ हजारांवर जागा रिक्त आहेत आणि महाविद्यालयातून अकरावीचे वर्ग सुरूही झाले आहेत. मात्र रिक्त जागांमुळे प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाकडून अजूनही सुरू ठेवण्यात आली आहे. रिक्त राहिलेल्या बहुसंख्य जागा कला व वाणिज्य शाखेच्या आहेत. त्यातही त्या स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित प्रकारच्या तुकड्यातील आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालकांचा विशिष्ट शाळा, महाविद्यालयाकडे असलेल्या ओढ्यास आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, त्याला मात्र प्रतिबंध बसलेला दिसत नाही.