बुलढाणा : माजी आमदार चैनसुख संचेती आणि बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या तीन तरुणांना दिल्ली येथे गुप्तचर विभागाने (आयबी) अटक केली होती. या प्रकारामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. मात्र, आता स्वत: राधेश्याम चांडक यांनीच या तिन्ही युवकांना आपल्या संस्थेत नोकरी आणि व्यावसायिक कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. चांडक यांच्या या मनाच्या मोठेपणामुळे त्या युवकासह त्यांचे कुटुंबीयदेखील भारावून गेले आहेत.चांडक यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातूून कौतुक होत आहे. जुनागाव परिसरातील शेरे अली चौकातील रहिवासी मिर्झा आवेज बेग (२१), शेख साकीब शेख अन्वर (२०) व उबेद खान शेर खान (२१) या संशयित युवकांना ‘आयबी’ने दिल्लीत अटक करून १३ सप्टेंबर रोजी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते.

‘आयबी’ व बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. या तिघांनी कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याच्या लालसेपोटी चांडक आणि संचेती यांच्या अपहरणाचा कट रचला होता. मात्र, ते दिल्लीत गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात अडकल्याने त्यांचा कट फसला. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून व समजपत्र देऊन सुटका करण्यात आली. बुलढाणा पोलीस व अन्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.बेरोजगार असल्याने तरुणांनी पैसे कमावण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे सांगितले. या घटनाक्रमामुळे हे युवक राहत असलेल्या संवेदनशील जुनागाव परिसरात खळबळ उडाली. या घटनेची चर्चा अजूनही सुरूच आहे. युवकांच्या या कृतीमुळे त्यांचे नातेवाईक व समाज बांधव थक्क झाले आहे.

हेही वाचा : प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्कारी पिढ्या निर्माण करते ; देवेंद्र फडणवीस

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे चांडक यांनी आता या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिन्ही युवकांना आपल्या संस्थेमध्ये नोकरी आणि व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव चांडक यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमोर ठेवला आहे. चांडक यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.याबाबत चांडक म्हणाले, या युवकांची चौकशी केली असता त्यांनी या अगोदर काही गैरकृत्य केले नसल्याचे समजले. बेरोजगारी आणि ‘इझी मनी’ च्या नादात ते थोडे चुकले, एवढेच! आवेज बेग त्याच्या वडिलासह क्षमा मागायला आला होता. यावेळी मी त्यांच्यासमोर नोकरी आणि कर्जाचा प्रस्ताव ठेवला. एरवी संस्थेत १० हजार कर्मचारी आहेतच, त्यात यांना सामावून घेण्यात काही अडचण नाही.

हेही वाचा : वृद्धाने घर भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर टाकली आणि …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्षमा करणे ही तर आपली संस्कृतीच’

माझ्या अपहरणाचा कथित कट रचणाऱ्या युवकांना मी बुलढाणा अर्बनमध्ये नोकरी वा व्यावसायिक कर्ज देण्याची ‘ऑफर’ देणे यात विशेष काहीच नाही. क्षमा करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून क्षमा करून महान झालेल्या भगवान महावीर, भगवान बुद्ध यांच्या विचारांचे आपण सर्व पाईक आहोत. – राधेश्याम चांडक, संस्थापक अध्यक्ष, बुलढाणा अर्बन.