नागपूर : अवघे दोन वर्षे वय असताना तो शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात अडकला. त्याचा जीव वाचवण्यासाठी सापळ्यात अडकलेली पायाची तीन बोटे कापावी लागली, पण जगण्याची उमेद त्याने सोडली नाही. वयाच्या १७व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आणि त्याच्या मृत्यूने सारेच हळहळले. तो ‘साहेबराव’च होता, ज्याचा जीवनप्रवास विसरण्यासारखा नाही.

बहेलिया शिकाऱ्यांनी गेल्या दीड ते दोन दशकांपासून राज्यातील आणि विशेषकरुन विदर्भातील वाघांना त्यांचे लक्ष्य केले आहे. वाघांच्या शिकारीत त्यांचा हातखंडा आहे. २६ एप्रिल २०१२ ला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाबाहेरील गोंडमोहाळी येथे बहेलिया शिकाऱ्यांनी वाघांसाठी पाणवठ्याजवळ स्टीलचा सापळा लावला होता.

त्यावेळी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेले दोन वर्षांचे ‘साहेबराव’ व त्याचा भाऊ दोघेही सापळ्यात अडकले. यात ‘साहेबराव’च्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर ‘साहेबराव’चा जीव वाचवण्यात यश आले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठातील तज्ज्ञ पशुवैद्यकांनी त्याच्या डाव्या पायाच्या पुढच्या भागावर उपचार केले.

उपचार योग्य झाले, पण सापळ्याच्या जखमा खोलवर होत्या. त्यामुळे गँगरिनचा धोका होता आणि तसे झाले असले तर ‘साहेबराव’चा पाय कापावा लागला असता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याची गंभीर जखम असलेली तीन बोटे कापण्याचा निर्णय घेतला. १२ डिसेंबर २०१२ ला त्याला नागपूरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आले. साडेतीन ते चार वर्षे याच प्राणीसंग्रहालयात तो होता. नंतर गोरेवाडा वन्यजीव बचाव व उपचार केंद्रात त्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

एक जून २०१६ ला ‘साहेबराव’ची रवानगी गोरेवाड्यात करण्यात आली. दरम्यान, वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत या वाघाला डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी दत्तक घेतले होते. थायलंडमध्ये त्यांच्या एका मित्राने पायात समस्या असणाऱ्या हत्तीला दत्तक घेतले होते. त्या हत्तीला कृत्रिम पाय बसवून त्याला चालण्यास सक्षम केले. डॉ. बाभूळकर यांनीही ‘साहेबराव’ला नीट चालता यावे म्हणून त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना त्यामध्ये अपयश आले आहे. हा प्रयोग फसला. त्यानंतर मात्र, ‘साहेबराव’ पुन्हा ठीक होईल, याविषयीची उमेद सोडून देण्यात आली.

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील ‘जीटी-१’ ऊर्फ ‘साहेबराव’चा नुकताच वृद्धापकाळाने मृत्यू झाला. २०१२ मध्य ब्रम्हपुरी वनविभागातील शिकाऱ्यांच्या सापळ्यात पाय अडकून तो अपंग झाला होता. यावेळी त्याला महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले. त्यानंतर २०१६ मध्ये या वाघाला गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले होते. सुमारे १७ वर्षांच्या या वाघाला पाच ऑगस्टपासूनच अशक्तपणाची लक्षणे दिसून आली.

प्राथमिक रक्त तपासणी आणि विष्ठेच्या नमुन्यांचे विश्लेषण यासह चाचण्या घेण्यात आल्या. तेव्हापासून या वाघावर वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीत उपचार सुरू होते. २२ ऑगस्टला उपचारादरम्यान या वाघाचा मृत्यू झाला. वाघाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण अवयव निकामी झाल्याचे सांगण्यात आले.