scorecardresearch

जंगलातील वाघांचे आयुर्मान वाढतेय! ; ‘वाघडोह’च्या मृत्यूनंतर वन्यजीवतज्ज्ञांचे निरीक्षण

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघडोह ऊर्फ स्केअरफेस’ वाघाचा सोमवारी वयाच्या सतराव्या वर्षी मृत्यू झाला.

नागपूर : वाघांचे जंगलातील आयुष्य उणेपुरे १२ ते १५ वर्षे. पण भारतातील काही वाघ याला अपवाद ठरले आहेत. महाराष्ट्रातील ताडोबात लोकप्रिय असलेल्या ‘वाघडोह’ नावाच्या वाघाचा आज सोमवारी सकाळी मृतदेह आढळला. वयाच्या १७ व्या वर्षी वाघडोहने शेवटचा श्वास घेतला. याआधी मध्य प्रदेशातील ‘कॉलरवाली’, ‘सीता’ आणि राजस्थानमधील ‘मछली’ या वाघांनी ही वयोमर्यादा ओलांडून इतिहास घडवला आहे. 

प्राणिसंग्रहालयातील वाघांची वयोमर्यादा अधिक असते. ते वीस वर्षे जगू शकतात. मात्र जंगलातील वाघ जास्तीत जास्त १५ वर्षे जगतात. गेल्या काही वर्षांत मात्र हे समीकरण बदलले आहे. राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील ‘मछली’चे वय मृत्यूच्या वेळी १९ वर्षे होते. रणथंबोरच्या या राणीच्या चेहऱ्यावर माशासारख्या खुणा असल्याने तिला ‘मछली’ नावाने ओळखले जायचे. तिच्या वास्तव्यामुळे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या उत्पन्नात गेल्या दहा वर्षांत तब्बल एक कोटी रुपयांची भर पडली होती. भारतातील ‘सुपर टायग्रेस मॉम’ म्हणून ओळखली जाणारी मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यातील ‘कॉलरवाली’ वाघीण मृत्यूवेळी सोळा ते सतरा वर्षांची होती. २९ बछडय़ांना जन्म देण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. २००५ मध्ये तिचा जन्म झाला होता. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघडोह ऊर्फ स्केअरफेस’ वाघाचा सोमवारी वयाच्या सतराव्या वर्षी मृत्यू झाला. मोहर्ली वन क्षेत्रातील अंधारी नदीजवळील वाघडोह येथे २००७ साली त्याचा जन्म झाला होता. तिथेच त्याचा अधिवास राहिल्याने त्याला ‘वाघडोह’ हे नाव पडले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ४० टक्के वाघ वाघडोहाच्याच वंशावळीतील आहेत. यात माया, तारा, लारा, माधुरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघ आणि वाघिणींचा समावेश आहे. यामुळे त्याची ‘बिग डॅडी’ अशीही ओळख निर्माण झाली होती. जंगलातील वाघांचे वाढते वयोमान वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरले आहे.

शिकारीच्या क्षमतेवर परिणाम

प्राणिसंग्रहालयातील वाघ असो किंवा बिबट या प्राण्यांना आयते खाद्य पुरवले जाते, त्यासाठी त्यांना परिश्रम करावे लागत नाहीत. त्यामुळे त्यांचे आयुष्य अधिक असते. जंगलातील वाघांना मात्र खाद्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुमारे ४० वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांना शिकार गवसते. वाघडोह, मछली यासारखे वाघ वयोमर्यादेपेक्षा अधिक जगले तरी त्यांची शिकार करण्याची क्षमता जवळजवळ संपलेली असते, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण खोलकुटे म्हणाले. 

देशातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू!

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व वाघडोह (टी३३) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या १७ वर्षीय वाघाचा सोमवारी सकाळी सिनाळा गावाजवळ मृतदेह मिळाला. वृद्धापकाळामुळे या वाघाचा  मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ताडोबासोबतच राज्यातील किंबहूना देशातील हा सर्वाधिक वृद्ध व मोठा वाघ असल्याचा दावा वन्यजीवप्रेमींनी केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघडोह या वाघाची एके काळी दहशत होती. अतिशय धिप्पाड असलेल्या वाघडोहने मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत ही दहशत कायम ठेवली. दोन दिवसांपूर्वीच सिनाळा गावाजवळ त्याने दशरथ पेंदोर (६५) या गुराख्याला ठार केले. ताडोबाचे अधिकारी व कर्मचारी वाघडोहवर लक्ष ठेवून होते. अशातच आज सकाळी त्याचा मृतदेहच मिळाला. या घटनेची माहिती तात्काळ ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर तथा अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आली. वाघडोहचे वय अंदाजे १७ वर्षे होते. मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. मागील काही दिवसांपासून त्याचा मुक्काम बफर क्षेत्रात होता. वाघडोहचे शवविच्छेदन करणारे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी दिलेल्यो माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच वाघडोहचा मृत्यू झाला असावा. कारण शरीर पूर्णत: सडलेले होते. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक लोणकर यांनी दिलेल्या माहितनुसार, वाघडोहचा हल्ली मुक्काम चंद्रपूर वन विभागाच्या सिनाळा गाव परिसरात होता. त्याचा मृत्यू नैसर्गिक असला तरी शवविच्छेदनानंतर काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tigers life is increasing in forest wildlife experts observation zws

ताज्या बातम्या