गडचिरोली : शहरातील कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत शिरलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात विशेष पथकाला अखेर यश आले. सकाळी ११ वाजता वाघीण दिसून आल्यानंतर डॉ. खोब्रागडे यांची चमू वाघिणीला पकडण्यासाठी परिश्रम घेत होती. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. पकडण्यात आलेल्या वाघिणीच्या गळ्याजवळ जखम आढळून आली.
हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट्याने घेतला ५३ माणसांचा बळी; खुद्द वनमंत्र्यांचीच कबुली
जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली असून वन्यजीव व मानव संघर्षदेखील मधल्या काळात वाढले. त्यामुळे जंगलातील वाघ महामार्गालगत दिसून येतात. सोमवारी तर एक वाघीण चक्क शहराच्या मध्यभागी असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत शिरल्याने चांगलीच तारांबळ उडाली. सुरवातीला दोन वाघ असल्याचे बोलल्या जात होते. मात्र, एक वाघीण होती. ती सुद्धा जखमी झाल्याने आश्रय शोधत शहरात आल्याचे सांगितल्या जात आहे. सहा तासांच्या परिश्रमानंतर डॉ. खोब्रागडे यांच्या चमूला वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. वाघिणीची माहिती मिळताच सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके यांनी सकाळपासून वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पाळत ठेवली होती.