अकोला : घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज वापरल्यास कमी दर लागणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी टीओडी मीटरची सक्ती करण्यात आली आहे. ग्राहकांवर ‘टीओडी’ मीटर लादण्यासाठी सवलतीचे गाजर दाखवले जात असल्याची टीका वीज तज्ज्ञांकडून केली जात आहे.

घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट ‘टीओडी’ मीटर लावण्याची मोहीम महावितरणने सुरू केली. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीज दरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली. त्यानुसार घरगुती ग्राहकांना ‘टीओडी’प्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरू झाला. त्याद्वारे ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. ‘टाईम ऑफ डे’ प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज ग्राहक घरातील अनेक उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात ‘टीओडी’ मीटरमुळे ग्राहकांचा आर्थिक लाभ होणार असल्याचा दावा महावितरणने केला.

सवलत कशी मिळणार?

महावितरणकडून सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७ – २८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीसाठी मात्र ‘टीओडी’ मीटरची सक्ती केली आहे. हे मीटर लावण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टिने ही सवलत सुरू करण्यात आल्याचे वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

अकोला परिमंडळात १.१४ लाख ग्राहक

महावितरणच्या टीओडी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर १ जुलै २०२५ पासून टीओडी सवलत लागू झाली आहे. ‘टीओडी’ मीटर बसवलेल्या अकोला परिमंडळातील एक लाख १४ हजार २९६ घरगुती ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात १५ लाख २५ हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.