बुलढाणा : कृषीप्रधान बुलढाणा जिल्ह्यात विविध कारणामुळे बैलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. दुसरीकडे कृषी तंत्रज्ञानात वाढ झाली आहे. यामुळे शेतातील नांगरणी, पेरणी, वखरणी आदि कामे जलद गतीने होत असून ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असलेल्या पोळा सणावर देखील होत आहे. यामुळे पोळ्यातील बैलांची संख्या रोडावली आहे.
या प्रतिकूल पार्श्वभूमीवर मेहकर येथे शिवसेनेच्या पुढाकाराने मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात येतो. यंदाही मेहकरात आज शुक्रवारी पोळ्याच्या दिवशी ट्रॅक्टर ची मिरवणूक काढण्यात आली. यात केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव हे ट्रॅक्टर चालवीत सहभागी झाल्याने सहभागी शेतकरी, ट्रॅक्टर मालक व शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून आले. कमी अधिक २०० ट्रॅक्टर सहभागी झाल्याने हा आधुनिक पोळा लक्षवेधी ठरला.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत शेती उपयोगी कामे केली जातात आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे.
शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातूनच शेतीची कामे केले जातात त्यामुळे पोळ्या सारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करण्यात आला मेहकर शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव,तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळुकर, शहर प्रमुख जयचंद भाटिया यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
तहसील चौकात फटाक्यांची आतिषबाजी
या ट्रॅक्टर पोळ्याचे जुन्या तहसील चौकात शहर शिवसेना (शिंदे गट) चे अध्यक्ष जयचंद बाठीया यांच्या नेतृत्वात फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ देऊन नामदार जाधव, रायमूलकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी समाधान सास्ते, गजानन सांगाडे, खवीस चे सावजी, दिवाकर मेहकरकर, संजय मेहकरकर, संतोष पवार, नितीन निकम, किरण महाजन, विनोद गुळवेकर उपस्थित होते.