नागपूर: सदरमधील वाहन कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावर उड्डाण पुल बाधून अनेक वर्ष झाले तरी तेथील सकाळी आणि रात्रीच्या वेळेतील गर्दी मात्र अजूनही कायम आहे. त्यामुळे उड्डाण पुलाचा खरच काही उपयोग झाला का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रिझर्व्ह बँकेपासून मानकापूर टोकापर्यंत दररोज होणारी वाहनांची गर्दी या भागातील नागपूरकरांसाठी डोकेदुखी ठरली होती. पार्किंगसाठी या मार्गावर जागा नसल्याने दिवसभर येथे वाहन कोंडी होत होती. रस्ता रुंदीकरणालाही जागा शिल्लक नव्हती. उड्डाण पुल हा एकमेव पर्याय शिल्लक होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिझर्व्ह बँक चौक ते मानकापूर चौकापर्यत उड्डाण पुल बांधला, काटोकडे जाण्यासाठी या पुलावरून वेगळा मार्ग करण्यात आला. पण हा पुल झाल्यावरही पूर्वीच्या सदर मार्गावरील गर्दी काही कमी झाली नाही. आजही येथे वाहने ठेवायला जागा शिल्लक नाही. मग पुलाची उपयोगिता काय? पुलाचा आराखडा चुकला का?
मुळात ज्यांना सदर किवा परिसरातील बाजारपेठेत जायचे असेल तर त्यांना पुलावरून जाण्याचा काहीही उपयोग होत नाही. ज्यांना थेट मानकापूर किंवा त्यापुढे जायचे असेल किवा काटोल मार्गावर जायचे असेल तेच पुलाचा वापर करतात. यापैकी ज्यांना काही खरेदी करायची असेल तर ते पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे पुल झाला पण वाहतूक कोंडी कायम असे सध्याचे चित्र आहे. रेसिडेन्सी रोड उड्डाणपुलाचा विकास ढासळल्याचे प्रमुख उदाहरण आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) इमारतीच्या मागे लँडिंगच्या सदोष डिझाइनमुळे राष्ट्रीय महामार्गावर अडथळा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशातील ही एक अनोखी घटना असावी. सदर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या प्रकल्पाचा उद्देश होता. परंतु, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस, जमिनीवरची परिस्थिती पूर्वीसारखीच बिकट असते. किंबहुना, आता एक इंचही पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने हा उड्डाणपूल त्रासदायक ठरला आहे.