नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातीस अर्धेअधिक वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे त्याचा सामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून ही समस्या सोडवण्याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून चौकात सिग्नल लावण्यात आले. मधल्या काळात झालेल्या अतिपावसामुळे अनेक ठिकाणी ही यंत्रणा नादुरुस्त झाली. त्यातील काही दुरुस्त करण्यात आले. पण, गेल्या काही दिवसांपासून अनेक सिग्नल बंद पडले. यात वर्दळीच्या चौकांतील सिग्नलचा समावेश आहे. यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. अशातच सिग्नल बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित होत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात दररोज नवीन वाहनांची भर पडू लागली असून बाहेरून नागपुरात येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे. सध्या माटे चौक, अंबाझरी टी पॉईंट, जाधव चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, शताब्दी चौक, तुकडोजी चौक, इंदोरा चौक, रहाटे कॉलनी, पंचशील चौक, सदर चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल बंद असतात. ते दुरुस्तही केले जात नाही. सकाळी कार्यालयात जाण्याच्या व परत येण्याच्या वेळी रस्त्यावर एकच गर्दी होते. अशा वेळी सिग्नल बंद राहात असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

हेही वाचा : सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत फक्त ८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. दिवसेंदिवस विस्तारित होत असलेल्या शहरात रोज नव्या वाहनांची भर पडतच आहे. शहरात एकूण १६५ वाहतूक सिग्नल असून प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करणे शक्य नाही. वाहतूक पोलीस नियमांबाबत जनजागृती करतात. परंतु, शहरात वारंवार व्हीआयपी बंदोबस्त असतो. पोलीस त्यांच्या बंदोबस्तात असतात. पोलिसांची कमतरताही वाहतूक विस्कळीत होण्यास काही अंशी कारणीभूत आहे. शहराचा विस्तार बघता आणखी ६०० ते ७०० वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. वाहतूक सिग्नल बंद असल्याबाबत वाहतूक पोलिसांना महापालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला जातो. दुरुस्तीबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यावर काही सिग्नल दुरुस्ती करण्यात आले. उर्वरित अद्यापही नादुरुस्त आहेत. पोलिसांच्या पत्राला महापालिका नेहमी केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : नागपूर : अंबाझरी तलावात बुडून मुलाचा मृत्यू ; दहा महिन्यातील बारावा बळी

पावसाळ्यामुळे सिग्नलच्या विद्युत यंत्रणेत बिघाड होतो. त्यामुळे काही ठिकाणी सिग्नल बंद पडले आहेत. बंद पडलेल्या सिग्नलच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी सिग्नलवर आडव्या आलेल्या झाडाच्या फांद्या कापण्याचे कामही सुरू आहे, असे महापालिकेच्या वाहतूक विभागाचे गजेंद्र तारापुरे म्हणाले.नादुरुस्त सिग्नल दुरुस्तीसाठी महापालिकासोबत पत्रव्यवहार केला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करतात. सिग्नल बंद असल्यानंतर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस तैनात केले जातात. वाहनचालकांनीही वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे प्र. सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) अमित डोळस यांनी आवाहन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic signal off problem for peoples in nagpur city tmb 01
First published on: 10-10-2022 at 09:24 IST