नागपूर: एसटी महामंडळासह इतरही शासकीय विभागातील बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. बऱ्याचदा मंत्र्यांशी जवळिक असलेले किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम होत असे. एसटी महामंडळाने ही प्रक्रिया पारदर्शी केली आहे. त्यामुळे आता संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने एका क्लिकवर एसटीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची बदली होतील.

एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार चालक- वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा ज्येष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पद्धतीने देणे शक्य होणार आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा ‘फुगा’ का फुटला ?

एक मध्यवर्ती कार्यालय, सहा प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत ३१ विभाग आणि या विभागांतर्गत कार्यरत असलेले २५१ आगाराबरोबरच तीन मध्यवर्ती कार्यशाळा, ९ टायर पुनस्त:रण प्रकल्प आणि एक मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था असा एसटी महामंडळाचा अवाढव्य पसारा आहे. या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी गंभीर आजारपण, पती- पत्नी एकत्रीकरण, आपापसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितता होत असते. परिणामी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे न्याय ‍मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे विनंती बदली अर्ज वर्षानुवर्ष धुळखात पडलेले असतात. याला आळा घालण्यासाठी आणि सेवा ज्येष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळण्याच्या हेतूने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय प्रणालीव्दारे ॲप एसटीमहामंडळाकडून विकसीत करण्यात येत आहे.

हेही वाचा – VIDEO : ताडोबात वाघ नाही, तर अस्वलाने केली ‘ही’ करामत; पाहून तुम्हीही म्हणाल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ॲपव्दारे विभागांतर्गत एका आगारातून दुसऱ्या आगारात, प्रदेशांतर्गत एका ‍विभागातून दुसऱ्या विभागात आणि राज्यात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात विनंती बदलीचे (एकाच पदात १ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे) अर्ज भरून घेण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्याला विनंती बदलीमध्ये तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी भविष्यात संगणकीय ॲप पद्धतीचा मोठा फायदा होणार असून विविध जात प्रवर्ग, बिंदु नामावली विचारात घेवून रिक्त पदाच्या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार बदल्या करण्याची संगणकीय पद्धत महामंडळाने स्वीकारली आहे. सबब, कर्मचाऱ्यांना समान न्याय देण्याबरोबरच महामंडळाच्या मनुष्यबळाचा क्षेत्रनिहाय समसमान वापर करण्यासाठी देखील हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. लवकरच या संगणकीय ॲपव्दारे बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.