नागपूर : एक हजाराहून अधिक लोकांचा जमाव.. ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी पोहचेपर्यंत असंख्य अडचणी.. बिबट्या अर्धवट तयार झालेल्या इमारतीच्या शौचालयात अडकलेला.. त्यामुळे त्याला रेस्क्यू करताना जीवावर बेतणारी परिस्थिती. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत अवघ्या तासाभरात बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले.

भांडेवाडी परिसरातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत बुधवारी सकाळीच बिबट्याने ठाण मांडले. इमारत बांधकामावरील कामगार आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली आणि तातडीने प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्स येथे असलेल्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुला रेस्क्यूचा कॉल गेला. काही अतिउत्साही प्राणीप्रेमींनी तोपर्यंत समाजमाध्यमावर प्रसिद्धीसाठी ही घटना सामाईक केली.

परिणामी रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस त्याठिकाणी आले, पण तो जमाव पांगवणे त्यांच्याही हातात नव्हते. दरम्यान ट्रान्झिटच्या बचाव पथकालाही या जमावाचा फटका बसला आणि घटनास्थळ गाठताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. सुरुवातीला पोलीसांनाही काही कळले नाही आणि त्यांनी चक्क रेस्क्यू पथकालाच अडवले. मात्र, नंतर ते ट्रान्झिटचे पथक असल्याचे कळताच त्यांनी तातडीने या पथकाला घटनास्थळापर्यंत पोहोचवले.

मात्र, ज्याठिकाणी म्हणजेच अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शौचालयात बिबट अडकला, ती एकूणच परिस्थिती रेस्क्यूसाठी कठीण होती. त्यावेळी रेस्क्यू पथकाचा थोडाही अंदाज चुकला असता तर त्यांच्या जीवावर बेतले असते. मात्र, हे आव्हान स्वीकारत त्यांनी अवघ्या तासाभरात ही मोहीम फत्ते केली. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे तज्ज्ञ पशुवैद्यक डाॅ. राजेश फुलसुंगे, त्यांचे सहाय्यक सिद्धांत मोरे, प्रवीण मानकर, तसेच विलास मगर, बंडू मगर, चेतन बारस्कर, वनरक्षक प्रतीक घाटे यांनी जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. सध्या या बिबट्याला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आणले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातच बिबट संघर्ष आहे का?

पश्चिम महाराष्ट्रात गेल्य काही दिवसात मानव-बिबट संघर्ष वाढल्यानंतर राज्य सरकारने उपायांसाठी अवघी तिजोरी रिकामी केली. मात्र, नागपूर शहरातही गेल्या काही वर्षांपासून बिबट शहरात येऊ लागला आहे.

मिहानमध्ये बिबट्याचे वास्तव्य नेहमीच असते. तर हिंगणा परिसरातही तो घरामध्ये शिरला आहे. एवढेच नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती भागात काही वर्षांपूर्वी चक्क आठवडाभर बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. मात्र, राज्य सरकारच्या लेखी राज्याची उपराजधानी दुर्लक्षीतच राहिली आहे.