नागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कमाल चौक ते दिघोरी उमरेडपर्यंत उड्डाणपूल उभारत आहे. त्यासाठी भांडे प्लॉट चौकातील एक ८४ वर्षे जुने झाड वाहतुकीसाठी अडथळा ठरत होते. महापालिकेने या हेरिटेज झाडाचे ‘ट्री ट्रान्सप्लान्टर मशीन’च्या सहाय्याने प्रत्यारोपण सोमवारी केले. महापालिकेच्या उद्यान आणि कार्यशाळा विभागाने भांडेप्लॉट येथील पिंपळाचा वृक्ष या मशीनच्या सहाय्याने शीतला माता मंदिरजवळ, भविष्य निर्वाह निधी कार्यालय जवळ यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. या यंत्राच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद झाली आहे. महापालिकेने ते यंत्र खरेदी केले आहे.

भांडे प्लॉट चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या रस्त्यावर मुखर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलजवळ पिंपळाचे मोठे ८४ वर्षे जुने झाड वाहतुकीसाठी अडथळा होते. या ३० फूट उंच झाडाला ‘ट्री ट्रान्सप्लान्टर मशीनच्या सहाय्याने जमिनीतून उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. हे करताना झाडाच्या मुळांना आणि खोडाला नुकसान न करता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डकोटा कंपनीची हे यंत्र महाराष्ट्रातील दुसरे यंत्र आहे. ठाणे महापालिकाकडे सुद्धा हे यंत्र आहे. या यंत्राचे काम रिमोटद्वारे केले जाते. अगोदर पोकलॅनने झाडाच्या जवळ मोठा खड्डा करण्यात आला. त्यानंतर या यंत्राच्या सहाय्याने झाडाला उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. या मशीनमध्ये १६०० लिटर पाण्याची टाकी सुद्धा आहे. जे झाड काढताना आणि लावताना पाणी टाकून झाडाच्या मुळांना पाणी देत राहते. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी अडथळे निर्माण करणाऱ्या झाडांना प्रत्यारोपण करण्यात या यंत्राची मदत होऊ शकते.