नागपूर :  रखडलेल्या ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’चे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यानुसार नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)तर्फे मेडिकल परिसरातील बांधकामाबद्दल निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’च्या बांधकामात आता वृक्षतोडीमुळे पेच निर्माण झाला आहे. महापालिका येथील वृक्षतोडीला परवानगी देणार का, याकडे नजरा लागल्या आहेत.

 अमित देशमुख यांनी २३ मार्च २०२२ रोजी विधानसभेत नागपुरातील मेडिकल परिसरात प्रस्तावित ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’चे काम लवकरच पूर्ण केले जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु, नागपूर महापालिकेने येथील वृक्षतोडीला गेल्या पंधरा दिवसांपासून परवानगी दिली नाही. याशिवाय, प्रस्तावित वास्तूत अग्निशमन विभागानेही काही त्रुटी काढल्या आहेत. त्यानुसार सुधारित नकाशे महापालिकेकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मेडिकलचे माजी कर्करोग विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी २०१२ साली या रुग्णालयासाठी लढा उभारला होता. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’ उभारण्याची घोषणा केली होती. यानंतर २०१५ मध्ये सत्तांतर झाले आणि भाजपप्रणित सरकारने नागपुरातील ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’ औरगांबादला पळवले. यानंतर डॉ. कृष्णा कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २ वर्षांत इन्स्टिटय़ूट उभारण्याचे निर्देश दिले होते. मात्र, भाजप सरकारने ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’च्या बांधकामाला पैसे न देता २०१८ मध्ये २३ कोटी रुपयांचा निधी यंत्रासाठी उपलब्ध करून दिला. हा निधा ‘हाफकिन’कडे पडून होता. ‘हाफकिन’ यंत्र खरेदी करण्यातही अपयशी ठरली.

२०१९ मध्ये बांधकामाच्या आराखडय़ाला मंजुरी मिळाली. पण २०२० मध्ये करोनाचे संकट आले. त्यामुळे राज्य सरकारने सर्वच बांधकामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने काम बंद होते. आता नागपूर महानगर विकास प्राधिकरणावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या संस्थेने निविदाही प्रसिद्ध केल्या आहेत. दोन महिन्यात बांधकाम सुरू होईल, असे मागील महिन्यात सांगण्यात आले. मात्र येथील काही वृक्षांना तोडण्याची परवानगी अद्याप न मिळाल्याने ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट’ अद्याप कागदावरच आहे. या वास्तूसाठी अग्निशमन विभागाकडूनही मंजुरीची प्रतिक्षा आहे. या वृत्ताला एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.