चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्याच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी दोन एकर जागा उपलब्ध असतांना प्रशासनाने रामबाग मैदानावर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट करणे, पहिल्यांदा मैदानावर खड्डा व दुसऱ्यांदा १०० वृक्षांची कत्तल केल्यानंतर इमारतीची जागा बदलवणे, प्रशासनाचे हे नियोजन समजण्या पलीकडचे आहे.
आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वेळेवर जागे झालो असतो तर कदाचित रामबागवर खड्डा व वृक्षतोड झाली नसती. त्यामुळे रामबाग मैदानावर खड्डा व वृक्षतोड होणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे सामूहिक अपयश आहे अशी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीच्या वतीने क्रीडांगण बचावासाठी वृक्षतोडीला निषेध करीत १०० झाडांचे वृक्षारोपण करून वृक्षारोपण आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ‘शतायुषी व्हा’, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ‘रामबाग मैदान आरक्षित करा, नेहमीसाठी सुरक्षित करा’ अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी शंभर झाडांची कत्तल करण्यात आली. या विरोधात सर्व पर्यावरण व क्रीडा प्रेमींनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. आंदोलनातील एक सैनिक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी वृक्षतोडीचा निषेध व्यक्त केला. रामबाग मैदानावर झालेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज मंगळवार २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ‘शतायुषी व्हा’, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ‘रामबाग मैदान आरक्षित करा, नेहमीसाठी सुरक्षित करा’ अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळी देशमुख यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे त्यांनी यावेळी जाहीर केले. विशेष म्हणजे उपयुक्त अशा देशी वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली. कडूनिंब, आंबा,आवळा, अर्जुनी, सागवान,जांभूळ, सिताफळ अशा स्थानिक पर्यावरणाला पूरक अशी एकूण १०० वृक्ष आंदोलनात सामील नागरिकांनी लावली. वृक्षतोड झालेल्या ठिकाणाच्या जवळ खड्डे करून सर्व झाडे लावण्यात आली.
या आंदोलनामध्ये संघर्ष समितीचे राजेश अडूर, अक्षय येरगुडे,मंतोष दास, रवींद्र माडावर, कुशाबराव कायरकर, भाविक येरगुडे, विलास माथनकर, महेंद्र राळे, रवी पचारे,राजेश ठाकूर, वनिता साठोणे, विजय बदखल, चंद्रकांत वासाडे, दिलीप होरे, नवनाथ डेरकर, प्रवीण अडूर, नितीन बन्सोड, इमदाद शेख, अशोक दिघीकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.