प्रबोध देशपांडे, लोकसत्ता
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने मांडण्यात आला आहे. अकोल्यात सलग पाचव्यांदा भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले असून भाजपने अनुप धोत्रे व काँग्रेसने डॉ. अभय पाटील हे नवीन उमेदवार दिले आहेत. यावेळेस तिन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती की नवा बदल घडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.

विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. आंबेडकर स्वत: सलग अकराव्यांदा येथून निवडणूक लढणार आहे. वंचितचा ‘मविआ’मध्ये सहभाग होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसनेदेखील आपला स्वतंत्र उमेदवार दिला. काँग्रेसने डॉ. पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पाटील यांनी २०१९ मध्येच लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा तांत्रिक अडचण आली होती. त्यानंतर आता त्यांच्या गळ्यात काँग्रेसच्या उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!

अकोल्यात काँग्रेसकडून नेहमीच प्रयोग करण्यात येतो. काँग्रेसने गेल्या चार निवडणुकांमध्ये माळी, मराठा व दोन वेळा मुस्लीम उमेदवार दिले. मात्र, त्यांना विजय मिळवता आलेला नाही. अकोल्यात ॲड. आंबेडकर सातत्याने स्वबळावर निवडणूक लढत असल्याने त्यांना पाडण्यासाठीच काँग्रेस विरोधात मुस्लीम उमेदवार देत असल्याचा आरोपही गेल्या १० वर्षांमध्ये झाला. यावेळेस वंचितसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर काँग्रेसने मराठा कार्ड वापरले आहे. त्यामुळे निवडणुकीतील रणनीतीत मोठा बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. ॲड. आंबेडकरांकडून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दलित, मुस्लीम, ओबीसी, आदिवासी, धनगर अशांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने अकोल्यात मराठा उमेदवार देऊन भाजपला शह देण्याची खेळी खेळली. संजय धोत्रे यांनी अकोल्यात सलग चार निवडणुका जिंकून भाजपचा अभेद्य गढ निर्माण केला. आता त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला समोरे जावे लागेल.

हेही वाचा >>> पंतप्रधानांची राज्यातील पहिली सभा रामटेकमध्ये; १० एप्रिलला कन्हानमध्ये प्रचार दौरा

अंतर्गत गटबाजी व परिवारदावावरून टीका होत असली तरी संघटनेवरील मजबूत पकड त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. काँग्रेसचे डॉ. पाटील नवा चेहरा असून त्यांच्यापुढे ‘मविआ’ला एकत्रित ठेऊन काँग्रेसच्या विजयाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान असेल. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी विविध प्रयोग करूनही त्यांना स्वबळावर लोकसभा गाठता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ॲड. आंबेडकरांपुढे इतिहास बदलण्याचे, तर अनुप धोत्रेंपुढे वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राहील. जातीय राजकारणात मतांचे धुव्रीकरण होणार आहे. ते कुणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राजकीय समीकरणे बदलली २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत संजय धो़त्रेंनी विदर्भात सर्वाधिक मताधिक्य घेत विक्रम रचला होता. त्यांनी दोन लाख ७५ हजार ५९६ मतांनी ॲड. आंबेडकरांचा पराभव केला. संजय धोत्रेंना पाच लाख ५४ हजार ४४४, वंचितला दोन लाख ७८ हजार ८४८, तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना दोन लाख ५४ हजार ३७० मतांवर समाधान मानावे लागले होते. गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राजकीय समीकरणे बदलली आहेत.