यवतमाळ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी या विभागाचे मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात धोरणात्मक, रचनात्मक आणि सकारात्मक काम सुरु आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, अशी स्तुतिसुमने पालकमंत्री संजय राठोड यांनी उधळली. धरती आबा योजनेंतर्गत आज शनिवारी येथे आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात मंत्री संजय राठोड आणि प्रा. डॉ. अशोक उईके एकत्र आले होते. तिथे संजय राठोड यांनी डॉ. उईके यांचे तोंडभरून कौतुक केल्याने राजकीय गोटात विविध चर्चा आहे.
आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी बिरसा मुंडा, शामादादा कोलाम अशा अनेक महापुरुषांनी विपरीत परिस्थितीत काम केले. राज्य शासनासह केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. पीएम जनमन या योजनेतून लाभार्थ्यांसह आदिवासी गावे, वस्त्या, वाड्यांसाठी विकासाची विविध कामे केली जात आहेत. धरती आबा योजनेतून आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.
धरती आबा व पीएम जनमन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी यावेळी दिले. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान करण्यासोबतच आदिवासी संस्कृती, गौरवशाली परंपरा जिवंत ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरु केले.
या अभियानाचा शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी विशेष शिबिरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहेत. १७ विभागांच्या २५ योजना आदिवासी लाभार्थ्यांना गावातच उपलब्ध होत आहेत, असे मंत्री उईके म्हणाले. प्रकल्प कार्यालयांनी न्यूक्लिअसमधून योजना राबविताना लाभार्थ्यांच्या हिताच्या आणि त्यांची खरी गरज असलेल्या योजनाच राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही डॉ.अशोक ऊईके यांच्या नेतृत्वात राज्यात आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी काम होत असल्याचे सांगितले. यावेळी या तिघांनी सोबत सेल्फीही घेतली. एरवी, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. उईके हे मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कुठलेच काम करत नाही, अशी चर्चा सर्वत्र असताना शिवसेनेचे मंत्री राठोड आणि भाजपचे आमदार तोडसाम यांच्या या कौतुकामागे काही ‘कारण’ तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे. या कार्यक्रमाला आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन आदी उपस्थित होते.