मैदानात काही काळ तणावाची स्थिती

यवतमाळ : लंकापती, आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या रावण राजाला का जाळता, असा प्रश्न उपस्थित करून यवतमाळ येथील विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी रावण दहनाविरोधात ‘चिपको’ आंदोलन केले. येथील शिवाजी मैदानात दरवर्षी परंपरेप्रमाणे दसऱ्याला रावण दहन केले जाते. यावेळी या प्रथेविरोधात आदिवासी संघटना एकवटल्याने मैदानात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा >>> वाशीममध्ये वीज कोसळून सतरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

रावणाचे दहन करायचे असल्यास आम्हाला सुद्धा जाळा, असे म्हणत आदिवासी समाज बांधवांनी रावणाच्या पुतळ्यासमोर टाहो फोडत चिपको आंदोलन केले. आदिवासी समाज गेल्या तीन वर्षांपासून शिवाजी मैदानातील रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहे. मात्र, या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत सर्व आदिवासी बांधवांनी रावणासोबत आपल्यालाही जाळावे, असे म्हणत ऐनवेळी हे चिपको आंदोलन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिवासी समाज बांधव रावणासमोरून उठायला तयार नव्हते. अखेर पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलक शांत झाले. या चिपको आंदोलनात राजू चांदेकर, सुवर्णा वरखडे, दिलीप शेडमाके, अरुण पोयाम, दिलीप उईके, निनाद सुरपाम, अरविंद मडावी, कृष्णा पुसनाके, नरेश ऊईके, निकिता उईके, विकेश मडावी, संजय मडावी, शुभम मडावी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.