अकोला : टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन खासगी बसवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर ते नागपूर द्रुतगती महामार्गावर पेडगाव गावाजवळ बुधवारी घडली. या अपघातात दोन जण ठार झाले असून २० प्रवासी जखमी झाले आहेत. मुकेश नाटे (वय ३६, कारंजा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अशोक वानखडे (वय ५५, ट्रॅव्हल्स चालक) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
वेळकाळ केव्हा येईल, हे सांगता येत नाही. क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी ट्रक व खासगी बसमध्ये भीषण अपघात झाला. पुण्याहून कारंजाकडे येणरी सिंध कंपनीची खासगी बस ( क्र. एमएच ३७ डब्ल्यू ७७७२) आणि नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक (क्र. सीजी ०४ एमएच ०३९१) यांच्यात समोरासमोर जबरदस्त धडक झाली.
भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटला. त्यामुळे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण गेले. ट्रक थेट विरूद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसवर आदळला. या भीषण अपघातात बसमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले, तर १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलवण्यात आले, तर किरकोळ जखमींवर कारंजा, शेलूबाजार आणि वाशीम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कारंजा, शेलूबाजार, मंगरूळपीर येथील १०८ रुग्णवाहिका तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
समृद्धीवर टायर फुटल्याने मोटारीचा अपघात
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ मोटारीचा टायर फुटल्याने ती लोखंडी दुभाजकावर आदळून अपघात घडला. समृद्धीवरून कारंजाकडे बाहेर निघणाऱ्या चॅनल क्र. १८१ + ५०० या ठिकाणी ‘मुंबई कॉरीडोर’ मार्गावर नागपूरवरून कारंजाकडे येणाऱ्या मोटारीचा (क्र. एमएच ३३ एए ८०२६) अपघात झाला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र कायम असल्याचे चित्र आहे.