नागपूर : राज्यातील महसूल विभागातील बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली. केंद्र सरकारच्या ‘पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन’ मंत्रालयाच्या ‘पर्सनल व ट्रेनिंग’ विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील बारा ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेचा म्हणजेच आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. त्यामुळे हे बाराही अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी या सर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी अधिक प्रतिक्रिया व्यक्त करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना माझे नेहमीच प्रोत्साहन राहीले आहे. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो.

लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, हा एकच उद्देश त्यामागे आहे. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे आणि म्हणूनच या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्वीट करताना म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती होय, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर या नवीन भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अमरावती येथील गजेंद्र बावणे यांच्यासह विजयसिंह देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील, महेश पाटील, पंकज देवरे, मंजिरी मनोलकर, आशा पठाण, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुळे, प्रतिभा इंगळे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यातच भारतीय वनसेवेत देखील काही पदोन्नती करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तब्बल तीन वर्ष उशिरा या पदोन्नती झाल्या. मात्र, त्यानंतरही त्यांना पदस्थापना न देता जुन्याच पदावर कार्यरत ठेवण्यात आले. अवघ्या चार ते सहा जणांना उपवनसंरक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली. उर्वरित अधिकारी मात्र भारतीय वनसेवेत पदोन्नत होऊनही ते त्यांच्या मुळ पदावरच काम करत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी ‘कॅट’मध्ये धाव घेतली आहे.