यवतमाळ : दोन विविध घटनांमध्ये संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पतींनी पत्नीची हत्या केल्याची घटना उजेडात आली. रक्तरंजित हत्याकांडाची ही गंभीर घटना यवतमाळ व आर्णी तालक्यात घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही घटनांमधील मारेकऱ्यांना तत्काळ अटक केली. गुरुवारी एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी जिल्हा हादरला.
दिव्यांनी चंद्रशेखर ठक (२७) रा. सोनाई नगर, यवतमाळ आहे मृत विवहितेचे नाव आहे. तर चंद्रशेखर उर्फ चंदू नारायण ठक (३४) रा. सोनाईनगर, असे मारेकरी पतीचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत आर्णी तालुक्यातील रुई येथील मंदा राहूल डोंगरे (४०) असे मृत विवाहितेचे तर राहूल श्रीराम डोंगरे (४१) रा. रूई असे मारेकरी पतीचे नाव आहे. यातील पहिली घटना ही आर्णी तालुक्यातील रूई येथे ६ ऑगस्ट रोजी घडली.
राहूल श्रीराम डोंगरे हा पत्नी, तीन मुली आणि आई वडीलांसह रूई येथील संजय इंगळे यांच्या शेतात राखणीसाठी राहात होता. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी त्याचे मंदासोबत भांडण झाले. त्यानंतर त्याने संतापाच्या भरात तिच्या कुन्हाडीने हल्ला केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर ती मृत झाल्याचे समजून तो खोलीचे दार बंद करून निघून गेला. दरम्यान शाळेतून घरी परतलेल्या मुलीच्या ही बाब लक्षात आली. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी मंदाला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात आणले. मात्र तेथे तिचा मृत्यू झाला. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी राहुल याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दुसरी घटना ही यवतमाळ शहरातील लोहारा बायपास मार्गावरील सोनाई नगरात घडली. मारेकरी पती चंदु हा पत्नी दिव्यानीसोबत येथील भोसा मार्गावरील सव्वालाखे ले आउटमध्ये राहत होता. मात्र तेथे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. त्यामुळे दिव्यानीच्या वडिलांनी जावाईं चंदुला सोनाई नगरातील प्लॅटमध्ये वास्तव्याला ठेवले. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी दुपारी अनैतिक संबंधाच्या वादातून पती पत्नीत भांडण झाले. यावेळी आरोपी पती चंदु याने संतापाच्या भरात तिच्यावर धारदार चाकूने वार केले.
या हल्ल्यात ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ लोहारा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दिव्यानीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच मारेकरी पती चंदु याला अटक केली. या दोन्ही घटनांनी जिल्हा हादरला असून, तीन दिवसातली खुनाची ही चौथी घटना आहे.