नागपूर : बनावट शालार्थ ओळखपत्राच्या आधारे नियुक्ती झालेल्या नागपुरातील दोन लिपिकांना रविवारी विशेष तपास पथकाने अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे तपास पथकाने ताब्यात घेतले हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. या अटकेनंतर आता या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या आता २० वर पोचली.
या घडमाोडीत या घोटाळ्यातील प्रमुख ‘सूत्रधार’ असलेल्या निलेश वाघमारेची विशेष तपास पथक आणि सायबर सेलने कसून चौकशी सुरू केली आहे. यात त्याने काही अधिकारी व संस्थाचालकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत अटकसत्र आणखी वेगाने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बनावट शालार्थ ओळखपत्र प्रकरणात रविंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात सर्वांत प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. एसआयटीकडूनदेखील विविध ‘धागेदोरे’ शोधण्यावर भर दिला जात आहे. या तपासादरम्यान हुडकेश्वर येथील श्रावणजी वाटकर उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपीक मंगेश केशव निनावे (३५) व नंदनवनमधील केशवनगर उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक मनिषकुमार केशव निनावे (३२) यांची नावे समोर आली. दोघेही सख्खे भाऊ असून ते ओंकारनगर येथील प्रज्योती कोर्ट अपार्टमेंट येथे राहतात. या दोघांचीही नियुक्ती बनावट शालार्थ ओळपत्राच्या माध्यमातून झाल्याचे तपास पथकाने केलेल्या पाहणीत आढळले आहे.
यातील मंगेशची नियुक्ती मार्च २०२३ मध्ये झाली होती. तर मनिषकुमार हा जुलै २०१९ पासून नोकरीवर लागला. या दोघांनीही त्यांच्या नोकरीच्या या कार्यकाळात ४१ लाख ४९ हजार इतके वेतन घेतले. त्यांनी अधिकारी व दलालांच्या माध्यमातून बनावट शालार्थ ओळखपत्र तयार करवून घेतले. त्यानंतर वेतन मंजूरीसाठी ते विभागाकडे पाठविण्यात आले. चौकशीतून ही बाब स्पष्ट होताच पोलिसांनी दोघांनाही रविवारी अटक केली. या दोघांच्या चौकशीतून आता आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
या घोटाळा प्रकरणात आतापर्यंत विशेष तपास पथकाने ३ उपसंचालक, ३ शिक्षणाधिकारी, ४ लिपीक आणि २ मुख्याध्यापकांना अटक केली आहे. यात आता आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे घोटाळा प्रकरणात अटक लिपीकांची संख्या ६ झाली आहे.
अन्य संस्थाचालकांचे धाबे दणाणले
या घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार निलेश वाघमारेच्या अटकेनंतर घोटाळ्यातील अनेक धागेदोरे समोर येण्यास सुरवात झाली आहे. बनावट ओळखपत्र तयार करण्यात आपला हात असल्याचे निलेशने तपास पथकाला दिलेल्या कबूलीत मान्य केले आहे. यात त्याने आणखी काही शिक्षण संस्था चालकांशी संगनमत करून त्यांनाही काही जणांचे बनावट शालार्थ ओळपतत्र तयार करून दिल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याने ज्यांना ज्यांना बनावट शालार्थ ओळखपत्र तयार करून दिले त्या संस्थेचे संचालक आणि त्या आधारे नियुक्ती मिळवलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.