महापालिकेचे आणखी दोन कर्मचारी करोनाग्रस्त; शहरात नवीन २० रुग्णांची भर

नागपूर :  न्यूरॉन्स या खासगी रुग्णालयातील परिचारिकेसह, महापालिकेचे दोन कर्मचारी व शहरातील इतर भागातील आणखी २० जणांना करोना विषाणूची बाधा झाल्याचे मंगळवारी पुढे आले. न्यूरॉन्स रुग्णालयातील ६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथेच खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ही परिचारिका बजाजनगरात राहते. येथील पूर्वीचे रुग्ण बरे झाले असताना आता पुन्हा नवीन बाधिताची नोंद झाल्याने नागरिकांना धडकी भरली आहे.

ही परिचारिका बाधित वृद्धाच्या संपर्कात आली होती. हा वृद्ध उपचारादरम्यान मेडिकलमध्ये दगावला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून वृद्धाच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या. त्यात ही परिचारिका बाधित आढळली. न्यूरॉन्स प्रशासनाने तातडीने परिचारिकेला शासकीय रुग्णालयात हलवले व रुग्णालयातील इतर ६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना  त्यांच्याच रुग्णालयात विलगीकरणात ठेवले.

याशिवाय मोमीनपुरा  १, नाईक तलाव २, लोकमान्यनगर २, हंसापुरी १, इतर २ अशा एकूण १४ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी अनेक जण विलगीकरणात आहेत.

५८३ पैकी ३८९ करोनामुक्त

उपराजधानीत आजपर्यंत एकूण ५८३ जणांना करोनाची बाधा झाली. यापैकी  ६७ टक्के म्हणजे ३८९ जण करोनामुक्त झाले आहेत. आज मंगळवारी मेयो रुग्णालयातून १ आणि मेडिकलमधून ४ जण करोनामुक्त होऊन घरी परतले. शहरातील विविध विलगीकरण केंद्रात सध्या १,८६३ जण असून गृह विलगीकरणातील २९९ जणांचा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. आजपर्यंत शहरात करोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर रुग्णांवर मेडिकल, मेयो, एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

तांडापेठ, गोपालकृष्ण नगर, वाठोडा आता प्रतिबंधित

आज मंगळवारी तांडापेठ, गोपालकृष्ण नगर वाठोडा व आशीनगर परिसरातील इंदोरा परिसर प्रतिबंधित करण्यात आला. या तीनही परिसरातून मंगळवारी सकाळपर्यंत ११० लोकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले. सतरंजीपुरा भागातील तांडापेठ प्रभाग क्रमांक २० मध्ये करोना बाधित आढल्यानंतर या भागातील दक्षिण पश्चिमेस असलेले केशवराव पौनिकर यांचे निवासस्थान, दक्षिण पूर्वेस बापू बन्सोड चौक, उत्तर पूर्वेस धनराज सायकल स्टोअर्स, उत्तरेस गणेश नंदनवार यांचे घर तर उत्तर पश्चिमेस हनुमाननगर परिसर बंद करण्यात आला आहे. नेहरूनगर झोनमध्ये प्रभाग २६ मध्ये शीतला माता मंदिर, मोरेश्वर कळसे यांचे घर, मुरलीधर निमजे यांचे घर व गणपतराव येरणे यांचे निवासस्थान तर आशीनगर झोनअंतर्गत न्यू इंदोरा परिसरातील अमोल चंद्रिकापुरे यांचे घर, ताराबाई गेडाम यांचे घर, नमो बुद्ध विहार, सुनील भिमटे यांचे घर, संकल्प बुद्ध विहार व मुरली टय़ूशन हा परिसर बंद करण्यात आला आहे. नेहरूनगर झोनमध्ये परिसर बंद करताना नागरिकांनी  अत्यावश्यक कामासाठी  काही भाग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नागरिकांचे काही न ऐकता परिसर बंद केला. दरम्यान, गोपालकृष्ण नगरातील  लोकांना जवळच असलेल्या सिम्बॉयसिसमध्ये विलगीकरणात नेणे अपेक्षित असताना तेथील लोकांना पाचपावली येथील पोलीस क्वार्टरमध्ये  नेण्यात आले. त्यामुळे अनेक लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ३० लोकांची सिम्बॉयसिसमध्ये व्यवस्था केली.

‘‘न्यूरॉन्सचा प्रत्येक आरोग्य कर्मचारी रुग्ण हाताळताना विशेष खबरदारी घेतो. एक परिचारिका बाधित असली तरी तिला एकही लक्षण नाही. लवकरच ती आजारातून बाहेर येईल. प्रशासनाने ६६ जणांना खबरदारी म्हणून रुग्णालयातच विलगीकरणात घेतले आहे.’’

– डॉ. प्रमोद गिरी,  संचालक, न्यूरॉन्स रुग्णालय.