यवतमाळ : शहरात खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नसून, २४ तासांत दोन खुनाच्या घटना घडल्या. दोन्ही घटनांत जवळच्या नातेवाईकांनीच घात केला असून, या घटनांनी यवतमाळ हादरले आहे.
शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पिंपळगाव बायपासवरील बालाजी मंगल कार्यालयाजवळ घडली प्रमोद पंढरी पेंदोरे (३७, रा. तिरुपती सोसायटी, पिंपळगाव) असे मृताचे नाव आहे, या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी कविश्वर उर्फ बाल्या पंढरी पेंदोर याला अटक केली आहे.
२० एप्रिल रोजी मृतक प्रमोद याने घरी वाद घातला होता.
त्याला दारूचे व्यसन होते. तसेच शेती आणि घराच्या हिस्से वाटणीसाठी तो त्रास देत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आरोपी बाल्या याने सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बायपास परिसरात मोठा भाऊ प्रमोदसोबत वाद घातला. यावेळी त्याने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने प्रमोदच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या प्रमोदला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून प्रमोदला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मारेकरी लहान भावास अटक केली.
मारेकरी फुटपाथवर प्रमोदला रॉडने मारहाण करत असताना बाजूने अनेक वाहनधारक, पादचारी ये जा करत होते. मात्र कोणीही त्याला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. प्रमोदचा मारहाणीत मृत्यू झाला की नाही, याची खात्री करून आरोपी त्याला मारहाण करत असल्याचे चित्रफितीत दिसते. हा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला असून, नागरिकांच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाद सोडवायला गेलेल्या जावयाला मेहुण्याने ठार केले
मायलेकाच्या वादात का आला असे म्हणून मावस मेहुण्याने बेदम मारहाण करून जावयाची हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री शहरातील तलाव फैल, पॉवर हाऊस येथे घडली. या प्रकरणी यवतमाळ शहर
पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून मारेकऱ्याला अटक केली आहे.शेरू जगदीश ठाकूर (४८ रा. कानपूर उत्तर प्रदेश, ह.मु यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. शहर पोलिसांनी मृतकाची पत्नी राधिका ठाकूर हिच्या तक्रारीवरून मारेकरी नितीन मनोहर कटरे (४७, रा.पॉवर हाऊस, यवतमाळ) याला अटक केली आहे. मृतक हा व्यवसायासाठी यवतमाळात आला होता. त्याने १९ वर्षांपूर्वी मारेकरी नितीनच्या मावस बहिणीशी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून तो पॉवर हाऊस परिसरातच राहत होता.
याच परिसरात नितीन आणि त्याचे कुटुंब वास्तव्याला आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मृतक शेरू हा पत्नी राधिकाच्या रसवंतीवर आला. यावेळी तो मद्य प्राशन करून असल्याने त्याच्याशी पत्नीने वाद घातला. रात्री पत्नी राधिका नेहमीप्रमाणे रसवंती बंद करून घरी आली. यावेळी मारेकरी नितीन रात्री वाजता घरी आला. भाऊजीसोबत वादावादी झाली आणि मी त्यांचा खून केला, असे म्हणून घटनास्थळी घेऊन गेला. या ठिकाणी शेरू निपचित पडून होता. त्याला शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. नितीनचा त्याच्या आईसोबत वाद सुरू असताना शेरू तो वाद सोडविण्यासाठी मध्ये आला. त्यामुळे नितीनने बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली.