भंडारा : पोलीस पाटील आणि कोतवाल भरतीसह परीक्षेत घोटाळा झाला असल्याची तक्रार करीत अनेक सामाजिक संघटनानी हा विषय उचलून धरला होता. त्या अनुषंगाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान कोतवाल आणि पोलीस पाटील घोटाळ्याप्रकरणी भंडारा आणि पवनीच्या तत्कालीन तहसीलदरासह तत्कालीन उपविभागीय अधिकारी, अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

तत्कालीन भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे आणि तत्कालीन पवनी तहसीलदार नीलिमा रंगारी, असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. रवींद्र राठोड हे सध्या पालघर उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भंडारा तालुक्यात कोतवाल पदाची भरती प्रक्रिया आणि परीक्षेदरम्यान पेपरफुटीचा प्रकार घडून मोठा घोळ झाल्याची बाब समोर आली होती. परीक्षेत अनियमितता, गैरप्रकार करून भरती प्रक्रिया झाल्याने प्रामाणिक व मेहनती उमेदवारांचे नुकसान होत असल्याचे बोलले जात होते. ही भरती रद्द करून नव्याने कोतवाल भरती करावी, अशी मागणी परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

हेही वाचा – सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण… पाहा आजचे भाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फुटीची माहिती मिळाली होती. परिणामी आरोपींना अटक करून तपास सुरू होता. पोलीस पाटील भरती प्रक्रियेतही असाच घोळ होता. भंडारा व पवनी तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात उमेदवारांनी दिलेल्या लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध न करता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व उमेदवारांना बोलविण्यात आले होते. या परीक्षेत अनियमितता असल्यामुळे या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी व ही परीक्षा गैरकायदेशीर असल्याचा आरोप करीत उच्च स्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. काल रात्री ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.