नागपूर : वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन तरुणांच्या आत्महत्यांनी सोमवारी राज्याची उपराजधानी पुन्हा हादरली. आत्महत्या केलेला एक तरुण अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतला (एम्स) प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून दुसरा होमगार्डमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होता. संकेत पंडितराव दाभाडे (२२) असे एम्समध्ये वसतीगृहात गळफास लावून आत्महत्या केलेल्या भावी डॉक्टरचे नाव आहे. तर यशवंत रमेश शाहू (३१) असे मानकापूर पुलावरून उडी घेत मृत्यूला कवटाळणाऱ्या होमगार्डचे नाव आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी संकेत दाभाडे हा एम्सध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. चरक वसतिगृहाच्या खोलीत त्याने सोमवारी गळफास लावला. एम्समधूनच त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण घेतले आहे. चरक वसतिगृहाच्या ९०९ क्रमांकाच्या खोलीत तो राहत होता. शनिवारी रात्री मित्रांनी त्याना शेवटचे पाहिले. रविवारी तो दिसत नसल्याने मित्रांना संशय आला. त्यांनी या बाबत वसतीगृहाच्या गृहपालाला माहिती दिली. गृहपालांनी काही विद्यार्थ्यांसह खोली गाठली. दरवाजा उघडून आत पाहिले असता सर्वांना धक्का बसला. संकेतने बाथरूमच्या दाराजवळ शॉलने आत्महत्या केल्याचे दिसले. कॉलेज प्रशासनाने तात्काळ सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. संकेतच्या खोलीतून कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. पोलिसांनी पुढील तपासासाठी संकेतचा फोन जप्त केला आहे. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. संकेतचे वडील शिक्षक असून त्याची एक बहीणही डॉक्टर आहे.

पुलावरून उडी घेत होमगार्डची आत्महत्या

जरिपटका येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होमगार्ड म्हणून कार्यरत यशवंत रमेश शाहू (३१) या तरुणाने कोराडी मार्गावरील मानकापूर उड्डाणपूलावरून उडी घेत मृत्यूला कवटाळले. सोमवारी भर दुपारी १.३० च्या सुमारास पुलावरून जाणाऱ्या अनेकांच्या डोळ्या देखल त्याने ही आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. अत्यंत वाहता रस्ता असलेल्या या मार्गावर झालेल्या आत्महत्येमुळे वाहतूक व्यवस्था काही काळ खोळंबली. यशवंत हा जरिपटका भागातील कुकरेजा नगर येथील रहिवासी आहे. तो जरिपटकातीलच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होमगार्ड कर्तव्य बजावत होता. महाराष्ट्रात सेक्युरिटी कंपनीतही सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा यशवंतहा सोमवारी कर्तव्यावरच जात होता. मात्र त्याने जाता जाता रस्त्यावर गाडी लावून उड्डाण पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी मानकापूर पोलिसांना याची माहिती दिली. फिरतीवरील पोलीस पथकाने घटनास्थळ गाठत यशवंतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोत पाठवला. यशवंतच्या आत्महत्येचे कारणही स्पष्ट झालेले नाही.

आई आणि पत्नीला धक्का

होमगार्ड म्हणून सेवेत असलेला यशवंत शाहू याचे सहा महिन्यांपूर्वीच छत्तीगडमधील सुनिता या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतरही तो त्याच्या सोबत होमगार्ड म्हणून कर्तव्यावर असलेल्या तरुणांशी फारसा बोलत नसल्याने मित्र त्याला नेहमी विचारायचेही. मात्र सध्या आपण पोलीस भरतीची तयारी करत असल्याचे सांगत तो वेळ मारून नेत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. यशवंतने अचानक हा टोकाचा निर्णय घेतल्याने त्याची आई आणि पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे.