अमरावती : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते ओडिशातील ब्रम्हपूर दरम्यान सुरू केलेली साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस आता आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याने विदर्भातील प्रवाशांना चांगली सुविधा प्राप्त होणार आहे. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.
१९०२१ उधना-ब्रम्हपूर अमृत भारत एक्स्प्रेस आता दर रविवार, बुधवारी आणि शुक्रवारी धावणार आहे. या दिवशी उधना रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.१० वाजता सुटेल आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर दुपारी १.०० वाजता पोहचले. अकोला दुपारी ३.२५, बडनेरा ४.४८, वर्धा ५.४८, नागपूर सायंकाळी ७.३५ आणि गोंदिया रेल्वे स्थानकावर रात्री ९.४० वाजता पोहचेल.
१९०२२ ब्रम्हपूर-उधना अमृत भारत एक्स्प्रेस ही ब्रम्हपूरहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी ती गोंदिया येथे सायंकाळी ५.५५, नागपूर ७.५५, वर्धा येथे रात्री ८.५८, बडनेरा १०.१०, अकोला ११.०७ वाजता पोहचणार आहे. ही गाडी आधी उधना येथून दर रविवारी तर ब्रम्हपूर येथून दर सोमवारी सुटत होती. आता आठवड्यातून तीन दिवस ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
ही गाडी सुरत येथे नियमितपणे व्यवसाय आणि इतर कामांसाठी जाणाऱ्या विदर्भातील प्रवाशांसाठी, कामगारांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. विदर्भातून ओडिशा राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना देखील या गाडीने चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यांना सुरक्षित, जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. अमृत भारत एक्सप्रेसचे उद्दिष्ट सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना आरामदायी प्रवास प्रदान करणे आहे. विविध सुविधांनी परिपूर्ण परंतु नियंत्रित प्रवास भाडे असलेली, ही गाडी सामाजिक-आर्थिक समावेशाचे प्रतीक असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. अमृत भारत एक्सप्रेसला तब्बल ११ सामान्य (अनारक्षित) श्रेणी आणि आठ स्लीपर व इतर डबे जोडले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे आधुनिक आसने आणि झोपण्याची सोय देखील आहे.
नवीन अमृत भारत एक्सप्रेस आधुनिक सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. विशेषतः नॉन-एसी स्लीपर आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. १,८०० हून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी ही गाडी १३० किमी प्रतितास वेगाने धावते. सुरक्षेसाठी सर्व डबे सीसीटीव्हीने सुसज्ज आहे. प्रवास भाड्यात इतर नियमित रेल्वे गाड्यांच्या तुलनेत थोडीशी वाढ असली, तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
