नागपूर : राज्यात अवकाळी पाऊस सातत्याने डोकावत असला तरीही वातावरणातला उकाडा मात्र कमी झालेला नाही. कमाल तापमानात घट झाली, पण उकाड्याने माणूस त्रस्तच आहे. जंगलातील प्राण्यांची अवस्थाही त्याहून वेगळी नाही. माणूस एकवेळ वातानुकूलीत साधनांचा वापर करुन हा उकाडा घालवेलही, पण प्राण्यांकडे पाणवठ्यात डुंबण्याशिवाय पर्याय नाही. अंगाचा दाह कमी करण्यासाठी तोच एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. म्हणूनच उन्हाळ्यात जंगलातील पाणवठ्यावर कायम प्राण्यांची गर्दी दिसते.
मात्र, एकदा का वाघाने त्याठिकाणी ठाण मांडले, तर इतर प्राणी तिथे भटकूही शकत नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘एफ-२’ ही वाघीण आणि तिच्या बछड्यांनी पाणवठा जणू आपलाच असे समजून ठाण मांडले आणि मग त्या बछड्यांची पाण्यातच मस्ती सुरू झाली. नागपुरातील वन्यजीवप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकार श्वेता अंबादे यांनी ‘एफ-२’ आणि तिच्या बछड्यांचा अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ चित्रीत केला आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातून हा वाघ अवघा दीड वर्षाचा असताना स्थलांतर करुन या अभयारण्यात आला. त्यानंतर कधी हायवेवर, कधी सिंचन प्रकल्पाजवळ असा बिनधास्त तो दर्शन देत होता. त्याच्यासाठी पर्यटकांची पावले या अभयारण्याकडे वळू लागली आणि एकेदिवशी तोच बेपत्ता झाला.(अर्थातच तो मरण पावला) त्यानंतर या अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. नंतर आलेल्या चांदी या वाघिणीने पर्यटकांना आकर्षित केले, पण खरे आकर्षित केले ते ‘फेअरी’ या वाघिणीने. ‘फेअरी’ आणि तिच्या पाच बछड्यांनी हे अभयारण्य गजबजले आणि पाठ फिरवलेल्या पर्यटकांनी पुन्हा या अभयारण्याकडे मोर्चा वळवला.
आता तिच्याच म्हणजे ‘फेअरी’च्या पाच बछड्यांपैकी एक असलेल्या ‘एफ-२’ या वाघिणीने देखील पाच बछड्यांना जन्म दिला. गोठणगाव गेटवरुन आत गेल्यास हे कुटूंब हमखास दिसते. आता तर उन्हाळा आहे आणि उष्णतेची झळ माणसांसोबतच जंगलातील वन्यप्राण्यांनाही बसत आहे. एकीकडे अंगाची लाहीलाही होत असताना पाणवठ्यातील पाण्यात डुंबण्याशिवाय वन्यप्राण्यांना पर्याय नाही. पाण्यात खेळण्याचा मोह कुणाला आवरत नाही. ‘एफ-२’ या वाघिणीने तिच्या बछड्यांसह पाण्यात डुबकी मारली. थोडावेळ डुंबल्यानंतर ही वाघीण बाहेर पडू लागली आणि बछड्यांनाही तिने बाहेर पडण्यास सांगितले. मात्र, ऐकतील ते बछडे कसले! ते बाहेर यायलाच तयार नव्हते.
हा क्षण श्वेता अंबादे यांनी अतिशय सुंदररित्या चित्रीत केला. नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतोय.