Nitin Gadkari on claimed paid political campaign on social media नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ॲग्रोव्हिजनची स्थापन झाली आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे माझ्याविरोधात बदनामीचा कट रचला जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते शुक्रवारी नागपूर येथे ॲग्रोव्हिजनतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतीत संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे तुम्हाला विरोध केला जात आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, इथेनॉलचा वापर इंधनात होत असल्याने आज सुमारे ३५० ते ४५०० इथॉनाल कारखाने उभे आहेत. मक्यापासून इथेनॉल बनू लागल्याने मक्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी रुपये मिळालेत.
पूर्वी मका प्रतिक्विंटल १२०० रुपये या दराने विकला जात असे. आज त्याचा दर २८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. इथनॉल तंत्रज्ञामुळे मक्याची लागवड तीन पट वाढली आहे. इथेनॉलला विरोध वेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्याबद्दल मी बोलणार नाही. मला कोणाच्या विरोधाची चिंता नाही. माझा मार्ग स्पष्ट आहे. मी कोणतेही चुकीचे काम करत नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेती उत्पादन वाढेल
कृषी उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होणार आहे. उसाचे उत्पादन प्रतिएकर १८० टन आणि सोयाबीनचे उत्पादन २० ते २५ टनपर्यंत जाऊ शकेल. कारण, एआयमुळे पिकांवर येणाऱ्या रोगाविषयी आधीच कळू शकेल. वेळीच उपाययोजना झाल्यामुळे उत्पादन वाढेल. सोयाबीनची एसओपी तयार झाली आहे. आता संत्रीसाठी एसओपी तयार केली जात आहे. त्याशिवाय एआयचा वापर होऊ शकत नाही, असेही गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ई-२० ब्लेंडेड पेट्रोलविषयी झालेल्या आरोपांवर ठाम आणि स्पष्ट उत्तर दिलं आहे. केंद्रात मोदीच्या सरकार आल्यानंतर पेट्रोलमध्ये इथेनॉल ५ टक्क्यांहून २० टक्के मिसळण्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहन खराब होतात, मायलेज कमी होतो, असे आरोप होत आहेत.
इथेनॉलची सरकारी खरेदी ३८ कोटी रुपयांवरून ३२० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. पुढील पाच वर्षांत २ लाख कोटी रुपयांची इथेनॉल अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे इथेनॉलसारख्या पर्यायांची मागणी वाढली असून, यामुळे संबंधित कंपन्यांना आर्थिक फायदा होत आहे.
मायलेज कमी होतो का?
इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असल्यामुळे गाडीला तेवढंच अंतर कापण्यासाठी थोडं जास्त इंधन लागतं. त्यामुळे मायलेजमध्ये घट होऊ शकते. इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे वाहन खराब होत आहेत, असा आरोप विविध प्लेटफार्मवरून होत आहे.