नागपूर : कॉंग्रेस नेते व देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांना केंद्र सरकारने भारत रत्न पुरस्कार जाहीर केला. राव हे दोनदा नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणून गेल्याने त्यांचा या जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राशी निकटचा संबंध होता. रामटेकमध्ये साकारलेले कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ही त्यांची संकल्पना होती.
नरसिंह राव मूळचे आंध्र प्रदेशचे असले तरी ते लोकसभा निवडणूक नागपूरजवळच्या रामटेक येथून लढत. नरसिंह राव यांची अनेक भाषा जाणणारे विद्वान अशी ओळख होती. नागपूरचे तत्कालीन युवा व उच्च विद्याविभूषित नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याशी जिव्हाळ्याच संबंध होते. राव आणि श्रीकांत जिचकार यांच्या चर्चेत महान कवी कालिदास यांच्या स्मरणार्थ एखादे संस्कृत विद्यापीठ उभे करायची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात तोपर्यंत संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष विद्यापीठ नव्हते. जिचकार यांनी पंतप्रधानांना सांगितले की हे विद्यापीठ महाराष्ट्रात तेही रामटेक येथेच उभारावे, कारण संस्कृत साहित्यातील अनमोल ठेवा मानले जाणारे मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदासाने रामटेक तेथेच लिहिले. नरसिंहराव यांना ही कल्पना प्रचंड आवडली. शिवाय रामटेक हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता. तिथल्या मातीचे पार फेडण्यासाठी काही तरी करायची त्यांची इच्छा होती. त्यांनी जिचकार यांना या विद्यापीठासाठी प्रयत्न करावेत असे आदेश दिले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक. डॉ. श्रीकांत जिचकार त्यांच्याकडे विद्यापीठाची मागणी मिळवण्यासाठी गेले. पंतप्रधानांचा सातत्याचा आग्रह यामुळे मुख्यमंत्र्यानी डॉ. श्रीकांत जिचकार यांची एक सदस्यीय समिती गठीत केली. डॉ. जिचकार यांनी भारतातील सर्व विद्यापीठांचे अध्ययन करून शासनाला एक विस्तृत अहवाल सादर केला.
हेही वाचा – साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांचा संघर्षातून स्वयंसिद्धतेकडे एकल प्रवास!
सदर अहवालाच्या अनुषंगाने व इतर शिक्षण शास्त्रज्ञांच्या अभ्यासाआधारे महाराष्ट्र शासनाने १८ सप्टेंबर १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामगिरीच्या पायथ्याशी महाकवी कालिदासाच्या चिरस्मरणार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. संस्कृत विद्यापीठात संस्कृत, पाली, प्राकृत, योग, आयुर्वेद, वेदांग ज्योतिष, भारतीय संस्कृती आणि मूल्ये, हस्तलिखीतशास्त्र, कीर्तनशास्त्र, ललितकला, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता, ग्रंथालयशास्त्र, परकीय भाषा अशा विविध विषयांवर पदविका ते पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संस्कृत विद्यापीठाने आधुनिकतेशी नाळ जोडून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. जसे कॉम्प्युटर अॅप्लिकेशन पदविका, पर्यावरण व्यवस्थापन पदविका इत्यादी. पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पौरोहित्य तसेच कीर्तनशास्त्र या विषयांवरील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच केंद्रीय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करवून घेणारे सिव्हील सर्व्हीसेस पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठात उपलब्ध आहे. किंबहुना असे सृजनशील अभ्यासक्रम राबविणारे संस्कृत विद्यापीठ हे संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव आहे.
विद्यापीठातील विविध पाच प्रमुख संकायांतर्गत आठ विविध विभागाद्वारे भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा परिचय करून देणारे सर्वांगसुंदर असे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी मिळून सुमारे ८० अभ्यासक्रम राबविले जातात. याशिवाय संस्कृत तसेच साहित्य, व्याकरण, दर्शन, योगशास्त्र, शिक्षणशास्त्र, वेदांग ज्योतिष या विषयांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे आचार्य पदवी व डीलिट करण्याची सोयही विद्यापीठात उपलब्ध आहे.
हेही वाचा – धक्कादायक! नागपुरात उद्यानच विकण्याचा घाट… काय आहे प्रकरण जाणून घ्या
विद्यार्थ्यांबरोबरच संस्कृत शिक्षक घडविण्याचे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे स्वतंत्र बी.एड. महाविद्यालय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृत विषयाचे शिक्षक घडविणारे हे एकमेव महाविद्यालय आहे हे विशेष !


