बुलढाणा : हवामान खात्याने दर्शविलेला अवकाळी पावसाचा अंदाज मर्यादित स्वरूपात का होईना खरा ठरला. जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने गारपीट, वाऱ्यासह हजेरी लावली आहे. दरम्यान, वीज पडून तीन पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. यामुळे घाटावरील उन्हाळ्याचे चित्रच पालटले.

बुलढाणा जिल्ह्याच्या घाटावरील भागातील काही तालुक्यांत आज सोमवार, ५ मे रोजी संध्याकाळी निसर्गाचे हे अवकाळी थैमान पाहवयास मिळाले. लोणार शहर व तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. लोणार शहरात कमी पावसाने हजेरी लावली. मात्र बीबी या गावासह बीबी महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या बहुतेक गावात, तसेच अन्य मंडळात अवकाळी चांगलीच हजेरी लावल्याचे वृत्त आहे. सिंदखेड राजा व मेहकर तालुक्याला जोडणाऱ्या बीबी गावात अवकाळी पावसाने मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. पावसाच्या तुलनेत वाऱ्याचा वेग जास्त होता. या दरम्यान बीबी व लगतच्या गावात बोरी एवढ्या आकाराच्या गार पडल्या.

लग्नसमारंभांना फटका

परिणामी बीबी येथे आयोजित एका लग्नसमारंभाला चांगलाच फटका बसला. यामुळे नवरदेव नवरीसह वऱ्हाड्यांची तारांबळ उडाली. त्यांना धावपळ करीत नजीकच्या भागात आडोसा घ्यावा लागला.

वज्राघाताने तीन जनावरांचा बळी

सिंदखेड राजा तालुक्यात आज सोमवारी विजेने थैमान घातले. तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता. या दरम्यान सावखेड तेजन येथे आज वीज अंगावर कोसळून तीन जनावरे दगावली. यात एक बैल, एक गाई आणि एका वासराचा समावेश आहे. बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या मालकीची ही जनावरे आहेत. झाडाखाली बांधून ठेवलेली ही जनावरे विश्राम करीत असताना त्यांच्यावर विजेचा लोळ कोसळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तलाठी व सिंदखेड राजा तहसील कार्यालय कर्मचारी यांनी सावखेड तेजन येथे भेट देऊन घटना स्थळचा पंचनामा केला. तसेच तहसीलदार सिंदखेड राजा आणि जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला. शासनाने बाधित शेतकऱ्याला तत्काळ मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी सावखेड तेजन येथील ग्रामस्थांनी केली आहे.