UPSC Result 2022 नागपूर: देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे.
गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यामुळे UPSC CSE २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
हेही वाचा : विश्लेषण : भारतात मोठ्या प्रमाणात IAS अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असण्याचं कारण काय?
यात नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील तीन विद्यार्थी पात्र ठरले होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रशिक्षण केंद्रामुळे विद्याथ्र्यांना अभ्यासात मदत होत असल्याचेही ते म्हणाले.
वर्ध्याची आकांक्षा तामगाडगेला देशपातळीवर ५६२ रँक
सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ. आकांक्षा तामगाडगे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची देशपातळीवरील रँक ५६२ आहे. तिने परराष्ट्र सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. ती २०१८ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेच्या तयारीस लागली.

वडील डॉ. मिलिंद व आई डॉ. माधुरी यांनी सतत प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यापेक्षा केंद्रीय परीक्षा देण्याकडे कल असल्याने ती पुण्यात राहून खासगी वर्गात शिकली. तिथे तयारी करीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली.
ती वणी येथील राहणार असून वडील स्वतःचा दवाखाना चालवितात, तर आई शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी आहे. तिचे गुरू डॉ. इंद्रजित खांडेकर सांगतात की आकांक्षा एक अत्यंत मेहनती, अभ्यासू विद्यार्थिनी आहे. ती पदवी सुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती.
यशस्वी विद्यार्थ्यांचं पंतप्रधान मोदींकडून कौतूक, अपयशी विद्यार्थ्यांना दिला आधार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचं अभिनंदन केलं आहे.
मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारताच्या विकासाच्या प्रवासाच्या महत्त्वाच्या काळात आपली प्रशासकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या या तरुणांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.”
“परीक्षेत यश मिळालं नाही त्यांची निराशा मी समजू शकतो”
“ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं नाही त्यांची निराशा मी समजू शकतो. मात्र, हे सर्व तरूण ज्या क्षेत्रात काम करतील तेथे उत्तम काम करतील आणि देशाचा गौरव वाढवतील, असं मला वाटतं. त्यांनाही माझ्या शुभेच्छा,” असंही मोदींनी म्हटलं.