अमरावती : महात्‍मा ज्‍योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेमार्फत (महाज्‍योती) आयोजित एमपीएससी प्रशिक्षण पूर्वपरीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्‍याने महाज्‍योतीने प्रवेश परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द केला आहे. महाज्योतीने यूपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता एका परीक्षा एजन्सी द्वारे १६ ते ३० जुलैपर्यंत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.

यूपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये काही परीक्षार्थी उमेदवारांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सी कडून गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता.

हेही वाचा >>>आर्णी येथील सराफा व्यवसायिकाला लुटणाऱ्या आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या हेतूने ३० जुलै रोजी एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत दरम्यान देखील विशिष्ट प्रशिक्षण संस्थेतील सराव प्रश्नपत्रिका मधील मोठ्या प्रमाणावर प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या. त्याचीदेखील चौकशी करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना दिल्या होत्या. याबाबत चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला याबाबत खुलासा करण्याकरिता सांगितले होते. परीक्षा एजन्सी कडून महाज्योतीच्या चौकशी अधिकारी यांना खुलासा सादर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्या संदर्भातील अहवाल व्यवस्थापकीय संचालक यांना सादर केला.

हेही वाचा >>>…अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला झाडू, वाचा कारण काय ते…

चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सी ने केलेल्या निष्काळजीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाला. परीक्षा एजन्सीने केलेल्या निष्काळजीमुळे महाज्योतीची प्रतिमा मलीन झाली. त्‍यामुळे सामंजस्य करारातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी परीक्षा एजन्सीचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश आज ३ ऑगस्ट रोजी निर्गमित केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून परीक्षा घेण्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे, असे महाज्योतीद्वारे कळविण्यात आले आहे.