‘यूपीएससी’ उत्तीर्ण स्नेहल ढोके, डॉ. दीक्षा भवरे यांची भावना; ‘लोकसत्ता’ला सदिच्छा भेट

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी परीक्षा आहे. मात्र, ‘यूपीएससी’ची तयारी करणाऱ्या मुलींबाबत सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. अनेकदा पालक मुलींच्या  शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य देतात. समाजाच्या दबावामुळे असे घडते. परंतु, ‘यूपीएससी’ एका प्रयत्नात उत्तीर्ण होता येईल, असे नाही. यात अनेक वर्षेही लागू शकतात. त्यामुळे पालकांनी आपली भूमिका बदलायला हवी, अशी भावना ‘यूपीएससी’मध्ये नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या डॉ. दीक्षा भवरे आणि स्नेहल ढोके यांनी व्यक्त केली. 

सात प्रयत्नानंतर पहिल्यांदाच पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसह यूपीएससीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या आणि हल्ली नागपूर येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत स्नेहल ढोके आणि दंतशास्त्राचे शिक्षण पूर्ण करून व मानव्यशास्त्राच्या विषयाचा अनुभव गाठीशी घेऊन यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या डॉ. दीक्षा भवरे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आलेले अनुभव कथन केले. स्नेहल ढोके म्हणाल्या, लहानपणी शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय जवळ होते. त्यामुळे जिल्हाधिकारी नावाचे एक मोठे पद असते हे कळले. त्यातून आवड वाढत गेली. जिल्हाधिकारी बनून आपण लोकांसाठी काही करू शकतो हेही समजले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले मात्र नोकरी न करता थेट दिल्ली गाठली. २०१४ पासून अभ्यासाला सुरुवात केली होती. मात्र, पूर्व परीक्षाच उत्तीर्ण होत नव्हते. घरच्यांचाही विश्वास उडत चालला होता. मात्र, याच दरम्यान एमपीएससी उत्तीर्ण केली आणि नायब तहसीलदार बनल्यावर स्थानिक पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. यावेळी सामान्यांच्या प्रश्नांना आणखी जवळून अनुभवता आले. नंतर यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा संकल्प केला. नोकरी, कुटुंब आणि अभ्यास या सगळ्यांची सांगड घालणे सोपे नव्हते. मी सहा वेळा यूपीएससीची पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे स्वत:ला प्रश्न विचारले, आपल्यातल्या उणिवा शोधल्या आणि आपण आपले शंभर टक्के कधी यासाठी दिलेच नाही हे ध्यानात आले. कार्यालय, घरकाम सारे काही करूनही रोज दहा तास अभ्यासाचे नियोजन केले. ‘स्टॉप वॉच’ घेऊन अभ्यास केला आणि सातव्या प्रयत्नात पूर्व, मुख्य आणि मुलाखत तिन्ही उत्तीर्ण करता आल्याचे स्नेहल ढोके यांनी सांगितले. पती, सासरची मंडळी, आई-वडील, कार्यालयाचे सहकारी साऱ्यांनीच सहकार्य केल्याने हे शक्य झाले. त्यामुळे लग्न झाले म्हणजे आपण संपलो असे मुळीच नाही. संघर्ष असला तरी यश मात्र नक्की मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दीक्षा भवरे म्हणाल्या, दंतशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर विविध ठिकाणी शिबिरे घेण्याची संधी मिळाली. यावेळी अधिकाऱ्यांशी संपर्क आला तसेच व्यवस्थेतील उणिवाही कळाल्या.

शिबिरात येणाऱ्या सामान्यांचे दु:खही जवळून पाहता आले. यातूनच प्रेरणा घेत आपणही अधिकारी व्हावे ही खूणगाठ मनाशी बांधली. २०१५ ला यूपीएससीची माहिती घेतली. त्यानंतर ‘यशदा’मध्ये प्रवेश मिळाला आणि अभ्यास सुरू झाला. नंतर ‘बार्टी’च्या मदतीने दिल्लीला शिकवणी घेतली. मात्र, मुख्य परीक्षेला घेतलेल्या लोकप्रशासन आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयांच्या अभ्यासाने घात केला. मधल्या काळात ‘एमपीएससी’ही दिली मात्र, त्यातही अपयश आले. त्यानंतर सारे काही सोडून २०१९ला पुन्हा यूपीएससीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. समाजशास्त्राचा अभ्यास केला आणि यश संपादन केले. या संपूर्ण संघर्षांत कुटुंबाची, मित्रांची मोठी मदत झाल्याचे डॉ. दीक्षा भवरे यांनी सांगितले. सरकारने प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन देण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा स्नेहल ढोके यांनी व्यक्त केली.

आत्मपरीक्षण करा..

‘यूपीएससी’ करायची असेल तर आधी अभ्यासक्रमाचा अभ्यास करा. अभ्यासक्रम इतका मोठा आहे की त्याचे परीक्षण करून आपल्याला नेमके काय वाचायचे आहे हे ठरवावे लागेल, असे डॉ. भवरे यांनी सांगितले.  अभ्यास करताना  आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. माझे काय चुकते, मी हे करू शकते की नाही, आपली क्षमता काय आहे, उणिवा काय आहेत याचे सतत आत्मपरीक्षण करत राहिले तरच आपण पुढचा टप्पा पार करू शकतो. त्यामुळे आत्मपरीक्षण करत राहा, असा सल्ला स्नेहल ढोके यांनी दिला.

एमपीएससीला बदलाची गरज

‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’मध्ये प्रचंड तफावत आहे. परीक्षा, मुख्य परीक्षा, निकाल याचे एमपीएससीमध्ये कुठेही नियोजन नाही. विद्यार्थ्यांची अनेक वर्षे वाया जातात. त्यामुळे एमपीएससी करणारे विद्यार्थी प्रचंड दडपणात जगतात, अशी खंत डॉ. दीक्षा भवरे यांनी व्यक्त केली.  एमपीएससीच्या अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदलाची गरज आहे.

नैराश्यातून यशाचा मार्ग

२०१८ला यूपीएससी मुख्य परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने प्रचंड नैराश्य आले. काय करावे काहीच सुचत नव्हते. त्यानंतर ‘स्नेहांचल’ या अनाथ शिशूंसाठी काम करणाऱ्या संस्थेला भेट दिली. येथे त्या संस्थेचे काम, मुलांचे दु:ख पाहून लढण्याचे बळ मिळाले. आपल्या दु:खापेक्षाही जगात अनेक मोठे दु:ख आहे याची जाणीव झाली. या भेटीने नवी उमेद दिली आणि पुढच्याच प्रयत्नात यूपीएससीचे यश गाठता आले. त्यामुळे अभ्यास करताना नैराश्य येणारच. मात्र, आपल्या भवतालच्या परिस्थितीकडे बघितले की आपले दु:ख ठेंगणे वाटायला लागून नवा मार्ग सापडू शकतो, असे डॉ. स्नेहल ढोके यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुष्य संपवणे हा उपाय नाही यूपीएससी असो की एमपीएसी ही एक परीक्षा आहे. ते काही संपूर्ण आयुष्य नाही. परीक्षेत पात्र वा अपात्र ठरणे हा केवळ एक भाग आहे. मात्र, स्पर्धा परीक्षार्थीनी खचून जात  आयुष्य संपवू नये, असा सल्ला स्नेहल ढोके यांनी दिला. आयुष्यात अनेक पर्याय आहेत त्याकडे सकारात्मकतेने बघा असेही त्या म्हणाल्या. अभ्यास करताना धार सोडू नका, तुमचीही वेळ नक्की येईल. स्वत:चे शंभर टक्के द्या. यश आले नाही तरी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची संपूर्ण प्रक्रिया ही तुम्हाला एक उत्तम नागरिक  नक्कीच बनवेल, असा विश्वास डॉ. दीक्षा भवरे यांनी व्यक्त केला.