वेळ मिळवूनही नागरिकांना मनस्ताप

नागपूर : गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात लस घेणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच उद्या गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी लस उपलब्ध होणार नसल्यामुळे कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे गुरुवारी लसीकरण होणार नाही. राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेवर शहरातील महापालिकेचे १२२ केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात गेल्या आठवडय़ात लस घेणाऱ्यांचा उच्चांक प्रस्थापित झाला. या आठवडय़ात मात्र सोमवारी काही निवडक केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मंगळवारपासून सलग तिसऱ्या दिवशी शहरातील १२२ केंद्रांवर लस उपलब्ध  नाही. आतापर्यंत ६ लाख ६८ हजार ४९७ नागरिकांनी लसीची पहिली मात्रा तर २ लाख १३ हजार ११ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. एकूण ८ लाख ८१ हजार ५०८ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात १८ वर्षांवरील १ लाख ४८ हजार १५६ युवकांनी  पहिली मात्रा तर ७ हजार ८६० युवकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. महापालिकेने लसीकरण केंद्र वाढवले असली तरी प्रत्येक केंद्रावर  लसीचा समान पुरवठा केला जात नसल्यामुळे अनेक केंद्रावर नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे ८५ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना लस मिळाली नाही. शाासनाकडून नागपूर महापालिकेला कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे सर्व लसीकरण केंद्रांवर गुरुवारी लसीकरण होणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.

कोव्हॅक्सिन उपलब्ध

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बॅरिस्टर राजाभाऊ  खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व. प्रभाकर दटके महाल रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिली मात्रा घेतली आहे त्यांना दुसरी मात्रा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्व. प्रभाकर दटके महाल रोगनिदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination stopped third day row ssh
First published on: 01-07-2021 at 01:06 IST