महापौर प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानांसह संघ मुख्यालय असलेल्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक समस्या वाहनतळाची आहे. दाट लोकवस्तीचा हा प्रभाग बाजारामुळे नेहमीच वाहतुकीच्या कोंडीला तोंड देतो. नागनदीच्या काठावर असलेल्या लोकांचे पुनर्वसन, उन्हाळ्यामध्ये काही वस्त्यांमध्ये जाणवणारी पाणी समस्या या इतरही काही समस्या या भागात आहेत.

शिवाजी पुतळा ते राम कुलपर्यंतच्या मार्गावर पाìकगचा मोठा प्रश्न आहे. पार्किंग प्लाझा तयार करण्याची नागरिकांची मागणी आहे. अग्रसेन चौक, अशोक चौक परिसरात नागनदीजवळ उड्डाणपूल प्रस्तावित आहे. तो बांधताना आपली घरे तर जाणार नाही ना, अशी शंका या भागातील नागरिकांना आहे. महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा जेथे होते ते टाऊन हॉल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. चांदीपुरा येथे पूर्वी बाजार होता तो आता बंद पडला असून बाजारातील ओटय़ावर आसपासच्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. सिंमेटचे अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहे मात्र, नवे रस्ते तयार करताना जुने रस्ते खोदून ते तयार करणे अपेक्षित होते. या प्रभागात कंत्राटदारांनी जुन्या रस्त्यावरच नवीन थर चढवला.

परिणामी नागरिकांच्या घराच्या लेव्हलपेक्षा (अंगणापेक्षा) रस्तेच उंच झाले त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरते. प्रभागात एक शासकीय वाचनालय होते, ते आता बंद पडले आहे. प्रवीण दटके यांचे वडील प्रभाकरराव दटके यांचे नाव देण्यात आलेले महापालिकेचे भव्य रुग्णालय प्रभागात आहे मात्र, येथे सोयीसुविधांची बोंब असून रुग्णालयच आजारी असल्यासारखी स्थिती आहे.

प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके महापौर असल्यामुळे प्रभागाकडे हवे तसे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या नगसेविका प्रभा जगनाडे यांनी तरी प्रभागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्या देखील कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

प्रभाग क्रमांक १८

प्रभागातील प्रमुख समस्या

  • फुटपाथसह रस्तेही अतिक्रमणाच्या विळख्यात.
  • बाजारपेठेचा परिसरात पाìकगची समस्या.
  • रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत.
  • दटके रुणालयच आजारी असल्यासारखी स्थिती.

प्रभागातील वस्त्या

चिटणीसपुरा, रचना कॉलनी, छत्रपती विद्यालय, एमएसईबी कार्यालय, नाईक रोड, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय, गरुड खांब, राजविलास चित्रपटगृह, कोतवाली पोलीस ठाणे, पाताळेश्वर मंदिर, दक्षिणामूर्ती चौक, राम मंदिर गल्ली, भोसले वाडा, भुतीया दरवाजा, कल्याणेश्वर मंदिर, संघ कार्यालय परिसर, कर्नल बाग, रामाजीची वाडी, काशीबाई देऊळ, रहातेकर वाडी, गाडी खाना, जोहरीपुरा, कोठी रोड, सिरसपेठ, मट्टीपुरा.

लोकसंख्या६६,६५२

अतिक्रमणाची समस्या

दाट वस्ती असलेल्या या प्रभागात प्रवीण दटके निवडून आल्यानंतर या भागात रस्त्याची आणि पार्किंगची मोठी समस्या होती, ती आजही कायम आहे. दटके महापौर असल्यामुळे त्यांना प्रभागाचा चेहरामोहरा बदलविण्याची नामी संधी चालून आली होती. अनेक कामे त्यांना मार्गी लावता आली असती. पाìकगचा मोठा प्रश्न प्रभागात आहे, तो सोडवायला हवा. रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे.

मिलिंद येवले, मागील निवडणुकीतील पराभूत उमेदवार

 

पाणी प्रश्न कायम

रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवे. प्रभागात भग्नावस्थेत असलेले एक मोठे समाजभवन आहे येथे असामाजिक तत्त्वाचा वावर वाढला आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी जमा होते. पावसाळ्यात या भागातील रस्ते जलमय होतात, पार्किंगची समस्या कायम आहे. केळीबाग मार्ग मोठा करण्यात आला नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात या ठिकाणी छोटय़ा विक्रेत्यांची गर्दी होत असल्यामुळे सामान्य माणसांना चालणे कठीण होत असते. पाण्याची समस्या या भागात आहे. अनेक वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

विलास देशमुख, नागरिक, महाल

 

दिलेला शब्द पाळला

झोपडपट्टीच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. प्रभागात सिमेंट रस्ते तयार झाले आहेत. शिवाय प्रभागात प्रलंबित कामे होती, ती जवळपास ९० टक्के पूर्ण झाली आहेत. मतदारांना केवळ आश्वासन दिले नाही तर काम केले आहे आणि त्या कामावर समाधानी आहे.

सुधीर राऊत, स्थायी समिती अध्यक्ष

 

समस्या कायमच

झोपडपट्टीवासीयांच्या समस्या अजूनही कायम आहेत. शिवाय ज्या भागात रस्ते करण्याची आवश्यकता होती, त्या भागात रस्ते झाले नाहीत. पार्गची समस्या मोठी आहे. नाल्याच्या काठावरील लोकांचे अजूनही पुनर्वसन केले नाही.

मधुकर कांबळे, मागील निवडणुकीतील पराभूत उमेदवार 

 

न्याय देण्याचा प्रयत्न

शहराचा महापौर असलो तरी नगसेवक म्हणून माझी जबाबदारी मी पूर्ण करीत आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे काही कामे शिल्लक असू शकतात पण, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला न्याय देण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

प्रवीण दटके, महापौर