नागपूर: राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्याच्या मुदतीबाबत मोठी घडामोड झाली आहे. परिवहन खात्याने ही पाटी लावण्याला मुदतवाढ दिल्याने लक्षावधी वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु मुदतवाढीनंतरही पाटी न लावलेल्या वाहन धारकांचे टेन्शन वाढले आहे. ही पाटी नसलेल्या वाहनांची बरीच कामे आरटीओत थांबवली गेली आहे. सोबत चवथ्या मुदतवाढीनंतर मात्र पाटी न लावलेल्या वाहनांवर आरटीओकडून कठोर कारवाईचा इशारा दिला गेला आहे.

महाराष्ट्र परिवहन विभागानं गुरुवारी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी नोव्हेंबर अखेरची नवीन अंतिम मुदतवाढ जाहीर केलीय. त्यामुळे राज्यातील लक्षावधी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळालाय. जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारने यंदा चौथ्यांदा वाढवली आहे. मूळ अंतिम मुदत प्रथम मार्च महिना होती, ती एप्रिल अखेर करण्यात आली, त्यानंतर जून अखेर आणि पुढे १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत आता नोव्हेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नुकतेच जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) वाहन मालकीचे हस्तांतरण, पत्ता बदलणे तसेच वाहनांमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास हायपोथेकेशन जोडणे किंवा काढून टाकणे यासारख्या कामांवर निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आरटीओ कार्यालयांना त्यांच्या फ्लाइंग स्क्वॉड्सनी जप्त केलेली वाहने एचएसआरपी नंबर क्रमांक पाटी मिळेपर्यंत सोडू नयेत असे सांगतानाच, एचएसआरपी नसताना वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनांमध्ये बदल आणि वाहन परवान्यांचे नुतनीकरण थांबवण्याचे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.

पाटी न लावणाऱ्यांवर १ डिसेंबरपासून कारवाई

महाराष्ट्र शासनानं एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ जवळपास साडे तीन महिन्यांची आहे. तोपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ३० नोव्हेंबरपर्यंत जे वाहनधारक अशी अपॉइंटमेंट घेतील. त्यांना सोडून जे वाहनधारक नंबर प्लेट बसवणार नाहीत किंवा अपॉइंटमेंट घेणार नाहीत त्यांच्यावर १ डिसेंबरपासून कारवाई केली जाणार आहे. त्या तारखेनंतर नंबर प्लेट नसलेल्या किंवा अपॉइंटमेंट नसलेल्या वाहनांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करण्याचा इशाराही परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वाहन धारकांना दिला गेला आहे. या इशाऱ्याला राज्यात पाटी न लावलेल्या ७० टक्के वाहन चालकांकडून कसा प्रतिसाद मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.