गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव बाजार समितीत भाजपा – राष्ट्रवादी युतीला यश मिळाले, तर गोंदियात या अभद्र युतीचा पराभव झाला. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या ‘चाबी’ संघटनेने काँग्रेससोबत युती केली होती. त्यांच्या परिवर्तन पॅनलला एकूण १८ पैकी १४ जागेवर यश मिळाले आहे.

आ. अग्रवाल यांनी माजी आमदारद्वय भाजपाचे गोपालदास अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांच्या सहकार पॅनलचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्या राजकीय वैरामुळे आमगाव व गोंदियात महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी या दोन बाजार समितीत भाजपाने राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणूक लढवली.

हेही वाचा – नागपूर : रामटेकमध्ये कॉंग्रेसचे सुनील केदार यांना धक्का, शिंदे गटाशी युती करूनही पराभव

आमगावमध्ये भाजपाचे माजी आमदार केशव मानकर यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या निवडणुकीत १८ जागांपैकी १४ जागांवर भाजपा-राष्ट्रवादीला विजय मिळाला. पण आमगाव येथे आखलेली रणनीती गोंदियात विद्यमान आमदाराने हाणून पाडत चाबी संघटना-काँग्रेस या परिवर्तन पॅनलला विजय मिळून दिला.