नागपूर : सत्तेची भूक आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात. “सीएम” चे अगदी तसेच झाले. अधिकारक्षेत्र अबाधित राखण्यासाठी एकसोबत नाही तर अनेकांसोबत वैर पत्करले, त्यात कित्येकदा जीवावर बेतले.
त्यातून बाहेर सुखरूप बाहेर पडले, पण यावेळी मात्र ही अस्तित्वाची लढाई “सीएम” च्या चांगलीच जीवावर बेतली आहे आणि यातून बाहेर पडणे आता अशक्य दिसून येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “सीएम” उर्फ “छोटा मटका” हा वाघ अस्तित्वाच्या लढाईत यावेळी चांगलाच गंभीर झाला आहे.
यातून तो बाहेर पडेल का याची शक्यता जरा कमीच आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील काही वाघांनी या व्याघ्रप्रकल्पाला ओळख दिली. ताडोबाच्या बफर क्षेत्रात या वाघाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. अगदी अलिझंझा ते निमढेला असा त्याचा मुक्त वावर असतो. प्रसिद्ध वाघीण “छोटी तारा” आणि शक्तिशाली वाघ “मटकासुर” यांचा तो वारसदार. “छोटा मटका” या वाघाने “मोगली” आणि “बजरंग” या दोन वाघांसह इतर प्रभावी वाघांकडून आलेल्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्याने एका विशाल प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ‘छोटा मटका’ या नावाने प्रसिद्ध वाघाची अधिवासासाठी ‘ब्रम्हा’ या नावाने प्रसिद्ध वाघाशी लढाई झाली. या लढाईत ‘ब्रम्हा’चा मृत्यू झाला तर ‘छोटा मटका’ गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या पायाला मोठा चिरा पडून सातत्याने त्यातून रक्त वाहत होते. लढाई झाल्यानंतर रक्ताळलेल्या पायासह तो पर्यटकांना दिसला. पर्यटकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्याऐवजी निसर्गावर सोपवण्यात आले. “लोकसत्ता” च्या वृत्तानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले.
त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे वाटत असतानाच आता त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे. छोटा मटका गुरे मारत उद्यानाच्या सीमेभोवती फिरत होता. त्याला पुन्हा मारताना दुखापत झाली. त्याच्या दुखापतीमुळे आणि कमी वेळात त्याला त्याचा बराचसा भाग गमवावा लागला आहे. तो मर्यादित क्षेत्रात फिरत आहे आणि इतर वाघांशी सामना टाळत आहे. वनविभाग त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे. “सीएम” लक्ष्य करण्यासाठी निमढेला हा सर्वोत्तम प्रवेशद्वार आहे कारण त्याची हालचाल मर्यादित आहे. त्याच्या समोर आलेल्या नव्या व्हिडिओत तो पुन्हा लंगडताना दिसून येत असून त्याला जमिनीवर पाय ठेवणे देखील कठीण जात असल्याचे दिसून येत आहे.