भाजपचा गड असलेल्या पश्चिम नागपुरात विद्यमान आमदार सुधाकर देशमुख आणि माजी महापौर विकास ठाकरे यांच्या थेट लढत असून ही निवडणूक या दोन्ही उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी ठरणार आहे.

भाजपचे देशमुख या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा तर काँग्रेसचे विकास ठाकरे दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. केंद्र आणि राज्यात सत्ता, नगरसेवकांचे पाठबळ आणि मजबूत असलेली पक्षसंघटना या देशमुख यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. मात्र सलग दहा वर्षे आमदार म्हणून विशेष ठसा उमटवण्यात देशमुख यांना आलेले अपयश आणि त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षात आणि मतदारांमध्येही असलेला नाराजीचा सूर या त्यांच्या नकारात्मक बाजू आहेत. त्यांना यावेळी उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा भाजपमध्ये होती. त्यामुळेच पक्षातील हिंदी भाषिकांनी या जागेवर दावा केला होता. मात्र  शेवटची संधी म्हणून देशमुख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाचाच प्रश्न झाला आहे.

दुसरीकडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून त्यांचे भाग्य अजमावित आहेत. २०१४ मध्ये ते पराभूत झाले होते. पण त्यांना मिळालेली मते लक्षणीय होती. सर्वच समाजघटकातील काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची फळी, लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची सवय,  विद्यमान आमदाराविषयी असलेली नाराजी आणि कुणबीबहुल मतदारसंघ या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र गतवेळी प्रमाणे यावेळीही काँग्रेसमधील त्यांचा पारंपरिक विरोधी गट त्यांच्या विरोधात सक्रिय आहे. कुणबी समाज संघटनेतील एक गट भाजपच्या प्रचारात सक्रिय आहे. ते भाजपात जाणार याबाबत जोरदार चर्चा त्यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत कायम राहावी, असे प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून करण्यात आले. ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी सर्व प्रयत्न पणास लावले आहेत.

मकरधोकडा, काटोल रोड, दाभा, अनंतनगर या भागात गेल्या निवडणुकीतून देशमुख यांना आघाडी मिळाली होती. यावेळी ठाकरे यांनी या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत विशेष फरक नव्हता. दोन्ही पक्षांना बरोबरीची संधी आहे. भाजपचा भर संघटनात्मक बांधणीवर तर काँग्रेसचा डोळा पारंपरिक मतदारांवर आहे.

१२ उमेदवार रिंगणात असले तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे.

हिंदी भाषक आणि दलित मतदारांचा कौल या मतदारसंघात नेहमीच निर्णायक ठरत आला आहे. बहुजन समाज पार्टीने अफझल अमर फारुक आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे डॉ. विनोद रंगारी यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचे या भागात चांगले नेटवर्क आहे.

एकूण उमेदवार- १२ – एकूण मतदार- ३,६०,८१९

२०१४ चा कौल

  •  सुधाकर देशमुख (भाजप)  ८६,५००
  •  विकास ठाकरे (काँग्रेस)  ६०,०९८
  •  अहमद कादर (बसपा)  १४,१९६