भाजप-काँग्रेसमध्ये थेट सामना
कामठी मतदारसंघात भाजपचे नेते व ऊर्जामंत्री तसेच या भागाचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक रिंगणात नसले तरी संपूर्ण निवडणूक ही त्यांच्याचभोवती फिरत आहे. या निवडणुकीतील निकाल हा त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारा ठरणार आहे.
नागपूर जिल्ह्य़ात भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून कामठीची ओळख आहे. सलग तीन वेळा बावनकुळे यांनी या मतदारसंघातून चढत्या मताधिक्याने विजय मिळवला. २०१४ मध्ये राज्यमंत्रिमंडळात ऊर्जा यासारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने कायापालट केला.
राज्य सरकारच्या विविध योजना गावापर्यंत पोहोचवून त्यांनी मतदारसंघ मागील पाच वर्षांत बांधला होता. त्यामुळे तेच या मतदारसंघातून निवडणूक लढतील आणि पुन्हा विजयी होतील, असाच अंदाज भाजपच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांनाही होता. मात्र भाजपच्या अंतर्गत राजकारणातून बावनकुळे यांची तिकीट ऐनवेळी कापली गेली. मात्र त्यांच्याच हाती या निवडणुकीच्या निकालाची चाबी आहे. या मतदारसंघातील भाजपचा विजय आणि पराजय हे त्यांच्यावरच अवलंबून आहे. त्यांचे राजकीय भवितव्यच ही निवडणूक ठरवणार असल्याने तेच केंद्रबिंदू ठरले आहेत.
भाजपकडन टेकचंद सावरकर, काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. सावरकर जि.प.च्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती व भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. सुरेश भोयरही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील यादवराव भोयर या भागाचे माजी आमदार होते. या निवडणुकीत बावनकुळे रिंगणाबाहेर असल्याने व त्यांना उमेदवारी नाकारल्याने बहुसंख्येने असलेला तेली समाज नाराज असल्याने त्याचा फायदा होईल असे काँग्रेस नेते सांगतात. मात्र बावनकुळे यांचा सावरकर यांना पाठिंबा आहे आणि तेच त्यांना निवडून आणतील, असे भाजप नेते दावा करतात.
२००४ मध्ये काँग्रेस-रिपाइंच्या उमेदवार सुलेखा कुंभारे यांचा पराभव करून बावनकुळे यांनी त्यांची आमदार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसच्या सुनीता गावंडे, २०१४ मध्ये काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा पराभव केला. सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख या मतदारसंघाची आहे.
दलित आणि मुस्लीम मतांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. बसपा व वंचित आघाडीचा या मतांवर दावा आहे. बसपाचे प्रफुल मानके, वंचित बहुजन आघाडीचे राजेश काकडे व एमआयएमचे शकीबुर रहमान अतीकुर रहमान निवडणूक लढवत आहेत.